Abdul Sattar Fund Misuse Allegation – माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. २०१४ साली आमदार निधीतून तब्बल १६ लाख रुपये खर्चून दोन रुग्णवाहिका खरेदी करून त्या स्वतःच्याच शिक्षण संस्थेला दिल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणात सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच अब्दुल सत्तार यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपल्ली यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २०१४ मध्ये आमदार असताना सत्तार यांनी आपल्या आमदार निधीमधून प्रगती शिक्षण संस्था, सोगाव या संस्थेला दोन रुग्णवाहिका दिल्या. ही संस्था सत्तार यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे, हे तथ्य शासनापासून लपवण्यात आले.
शासकीय परवानगीशिवाय आणि शासनाची दिशाभूल करून हा व्यवहार करण्यात आला, जे पूर्णतः नियमबाह्य आहे. शासनाच्या नियमानुसार आमदार निधीतून खाजगी संस्था किंवा हॉस्पिटलला रुग्णवाहिका देण्यास परवानगी नसताना सत्तार यांनी हा निर्णय घेतला.
या प्रकरणात तक्रारदार गणेश शंकरपल्ली यांनी सुरुवातीला सिल्लोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. तरीदेखील कारवाई न झाल्याने त्यांनी शेवटी सिल्लोड न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांना तपास करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
हे देखील वाचा –
ट्रम्प यांची ‘लाडकी बहीण’ योजना! अमेरिकेतील नागरिकांना देणार 2,000 डॉलर
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये संघ गीत गाण्यावरून वाद ! चौकशीचे आदेश
सिंचन घोटाळ्याचे आरोपही खोटे ठरले ! आताही बिनबुडाचे आरोप! अजित पवार बिनधास्त









