Adani Eyes Sahara Deal – अदानी समुहाला आपल्या ८८ मालमत्ता विकण्यासाठी सहारा समुहाने सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. परवानगी देण्याआधी न्यायालयाने सर्व संबंधितांकडून उत्तर मागविले आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यास तो भारताच्या बांधकाम क्षेत्रातला सगळ्यात मोठा व्यवहार म्हणून ओळखला जाईल.
तब्बल १ लाख कोटी रुपयांमध्ये अदानी प्रॉपर्टीज लिमिटेड या मालमत्ता सहारा इंडिया कमर्शियल कॉर्पोरेशनकडून खरेदी करणार आहे, असा अंदाज या घडामोडीशी संबंधित लोकांचा आहे.
सहारा समूह दिवाळखोरीत निघाल्यानंतर सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये समूहाच्या दोन कंपन्यांना ‘सेबी-सहारा’ खात्यात २५ हजार कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यापैकी ९,४८१ कोटी रुपये अजूनही जमा करायचे आहेत.
त्यासाठीच पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी सहारा समुहाने मालमत्ता विक्रीचा पर्याय निवडला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई, न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांच्या पीठासमोर याप्रकरणी सुनावणी सुरू आहे.
यावेळी सहारा समुहातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला व्यवहाराची माहिती दिली. सिब्बल यांनी सांगितले की, दोन्ही व्यावसायिक संस्थांनी मालमत्ता विक्रीचा करार केला असून तो न्यायालयात एका सीलबंद लिफाफ्यात सादर करण्यात आला आहे. न्यायालयाची परवानगी मिळाल्यावर या करारावर पुढील कार्यवाही केली जाईल.
याला दुजोरा देत अदानी समुहातर्फेही ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतोगी यांनी न्यायालयाने परवानगी दिल्यास या मालमत्तांची एकगठ्ठा खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. पण लिफाफाबंद करारामध्ये या मालमत्ता खरेदीसाठी किती रुपये दिले जाणार आहेत, याबद्दल आपण अनभिज्ञ असल्याचा दावा त्यांनी केला. पण या घडामोडींशी संबंधित अंतर्गत लोकांच्या मते, हा खरेदी-विक्री व्यवहार तब्बल १ लाख कोटीहून अधिक रुपयांचा आहे.
हे देखील वाचा –
क्रिकेट सामन्यावेळी नकार ! मात्र हाॅकीत भारत पाक खेळाडूंचे हस्तांदोलन
बाबासाहेब पाटलांचा पालकमंत्रिपदाचा राजीनामा ! इंद्रनील नाईक नवे पालकमंत्री
चंद्रकांत पाटलांचा सल्ला घ्यावा लागेल ! रवींद्र धंगेकरांचा टोला