Ajit Pawar Death – DGCA Grounds VSR Learjet – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालया (डीजीसीए)ने व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या लिअरजेट ४०/४५ प्रकारातील विमानांच्या उड्डाणावर हवाई मानके पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई केल्याचे निवेदनात स्पष्ट केले.
डीजीसीएने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे कंपनीच्या लिअरजेट-४५ (व्हीटी – एसएसके) विमानाला अपघात झाला होता. या घटनेनंतर डीजीसीएने संबंधित कंपनीचे विशेष सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले. तपासणीदरम्यान हवाई पात्रता, उड्डाण सुरक्षा तसेच ऑपरेशनल प्रक्रियांमध्ये मंजूर नियमांचे अनेक पालन झाले नसल्याचे निदर्शनास आले.
तपासणी अहवालानुसार विमानांच्या देखभाल प्रक्रियेत आणि सुरक्षा मानकांच्या अंमलबजावणीत गंभीर उणिवा आढळल्याने व्हीटी – व्हीआरए व्हीटी-व्हीआरएस,व्हीटी-व्हीआरव्ही आणि व्हीटी-टीआरआय नोंदणी असलेल्या लिअरजेट ४०/४५ विमानांच्या उड्डाणांवर पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. आवश्यक सुरक्षा निकष पूर्ण होईपर्यंत या विमानांना उड्डाणाची परवानगी दिली जाणार नाही.
Press Note on Special Safety Audit of M/s VSR Ventures Pvt Ltd pic.twitter.com/T0uiIPbqqV
— DGCA (@DGCAIndia) February 24, 2026
डीजीसीएने व्हीएसआर कंपनीला विमानांत आढळलेल्या त्रुटींवर सविस्तर कारणे सादर करण्याचे निर्देश दिले असून सुधारात्मक उपाययोजना राबविण्यास सांगितले आहे. संबंधित कमतरता दूर झाल्यानंतरच पुढील मूल्यांकन करून उड्डाणास परवानगी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात या प्रकरणी सतत आवाड उठवणारे शरद पवार गटाचे आ. रोहित पवार यांनी एक्सवर लिहिले की, व्हीएसआर कंपनी कुठल्याही नियमांचे पालन करत नाही. ही कंपनी अत्यंत मनमानी पद्धतीने असुरक्षितपणे विमाने उडवत असल्याचा मुद्दा आम्ही वारंवार मांडत आहोत. आज डीजीसीएने त्याच मुद्द्यावर व्हीएसआरची चार विमानांच्या उड्डाणांवर बंदी केली आहे. आपल्या लढ्याला यश येत असले तरी हे केवळ नखाएवढे आहे. अजून बरेच काही समोर यायचे बाकी आहे. उद्या सकाळी या विषयावर सविस्तर बोलेल.
VSR कंपनी कुठलेही compliances फॉलो करत नाही, अत्यंत मनमानी पद्धतीने असुरक्षितपणे विमाने उडवत असल्याचा मुद्दा आम्ही वारंवार मांडत आहोत आणि आज DGCA ने त्याच नॉन compliance च्या मुद्द्यावर VSR ची चार विमाने ग्राउंड केली आहेत. आपल्या लढ्याला यश येत असले तरी हे केवळ नखाएवढे आहे, अजून… pic.twitter.com/cQMnYdbCir
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 24, 2026
या निर्णयावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की,डीजीसीएच्या या कारवाईला चोर तर चोर वर शिरजोर असे म्हणता येईन कारण डीजीसीएने व्हीएसआरवर कारवाई केली परंतु या गोष्टीला डीजीसीएही जबाबदार आहे त्याचे मरण त्यांनी व्हीएसआरवर ढकलू नये.अजित पवारांच्या मृत्यूनंतर एक महिन्यानंतर अहवाल दिला म्हणजे इतके दिवस तुम्ही झोपा काढल्या का ? माझ्यासह राज्यातील अनेकांनी अजित दादांचे विमान नादुरुस्त असल्याचा दावा केला होता त्यावर आज डीजीसीएने शिक्कामोर्तब केला. त्यांनीही जबाबदारी घेतली पाहिजे. डीजीसीएवरही कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्या आरोपात सत्यता असल्याचे अधोरेखित केले.
हे देखील वाचा –
मुस्लिम आरक्षणाचा फैसला जवळ? उच्च न्यायालयात ९ मार्चला निर्णायक सुनावणी
काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना जबरदस्त मारहाण, पोलिसांनी केली तुषार दामगुडेची रिव्हॉल्व्हर जप्त..
जपानी मुलीचा तो व्हिडिओ व्हायरल! राज ठाकरेंनी व्हिडिओ शेअर करत थेट मोहन भागवंतांवर साधला निशाणा..












