Ajit Pawar Threatened to Quit Govt: Danve Claim – आपला पुत्र पार्थ पवार याच्यावर आरोप झाले त्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा संशय आल्याने अजित पवार संतप्त झाले आहेत. याचमुळे त्यांनी थेट इशारा दिला की आरोपांची ही शृंखला थांबली नाही तर मी सरकारमधून बाहेर पडेन. त्यांच्या या धमकीनंतर पार्थचा यातून बचाव करण्याचा निर्णय झाला. उबाठा नेते अंबादास दानवे यांनी हा आरोप आज केला. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा फेटाळून लावला.
पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवार यांनी वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर बैठकीतून बाहेर आल्यावर हा जमीन व्यवहार रद्द झाल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली होती. या बैठकीत काय घडले हे सांगताना अंबादास दानवे म्हणाले की, जमीन संबंधी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षावर मोठ्या घडामोडी घडल्या. माझ्या माहितीनुसार, त्या दिवशी वर्षावर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी त्वेषाने, रागाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरून सरकारला पाठिंबा देतो, अशी भूमिका घेतली होती, असे माझ्या कानावर आले आहे. या प्रकरणी खरे-खोटे लवकरच बाहेर येईल. अजित पवार व पार्थ पवार यांना वाचवले जात आहे, असे मला वाटते.
ते पुढे म्हणाले की, या प्रकरणाबाबत भाजपाला माहिती होती, हे सर्व उघड झाल्यानंतर अजित पवार अडचणीत येतील हा त्यांचा उद्देश होता. आता अजितदादांची फाईल तयार केली आहे. उद्या जर अजित पवारांनी काही केले तर एक मिनिटांत पार्थ पवारांना अटक होऊ शकते. हे भाजपाचे षड्यंत्र आहे. भाजपानेच हे प्रकरण बाहेर काढायचे, त्यानंतर संबंधितांनी आपले ऐकले पाहिजे अशा दृष्टीने प्रयत्न करायचे. ही भाजपाची मोडस ऑपरेंडी ही गुन्हेगारी स्वरुपाची आहे. महार वतनाची जमीन विकली जाते. कंपनीचा संचालक म्हणून पार्थ पवार याच्यावर कारवाई होत नाही.
मुद्रांक शुल्क माफ केले जाते. व्यवहार रद्द झाला सांगतात, मात्र कायद्याने व्यवहार रद्द झाला तरीही मुद्रांक शुल्क भरावेच लागेल असे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुद्रांक शुल्क कसले, अशी घेतलेली भूमिका चूक आहे. शरद पवारांनी या प्रकरणी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. पार्थ पवारांना कसे वाचवले, हे फडणवीसांनाच विचारा असे ते म्हणाले. पार्थ पवार या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याशिवाय वाचूच शकत नाहीत.
अंबादास दानवे यांनी हा दावा केल्यावर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी त्याला दुजोरा देत म्हटले की, पुण्यातील जमीन घोटाळ्यात पार्थ पवार जबाबदार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा घोटाळा बाहेर काढून भाजपाने या प्रकरणी अजित पवार व त्यांच्या पक्षाची कोंडी केली आहे. या माध्यमातून आगामी निवडणुकीत पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपापूरक भूमिका घ्यावी असा डाव आहे.
भविष्यात महायुतीत सर्वात पहिला आघात अजित पवारांच्या पक्षावर केला जाईल. त्यानंतर त्यांच्यावर स्वतःहून सरकार बाहेर पडण्याची वेळ आणली जाईल. अंबादास दानवे यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी
स्वतः त्यावेळी वर्षा बंगल्यावर होतो. अजित पवार व त्यांचे सहकारी एका वेगळ्याच कामासाठी तिथे आले होते. त्यावेळी त्यांच्यात दानवे म्हणतात तशी कोणतीही चर्चा झाली नाही. दानवे खोटे बोलत आहेत.
हे देखील वाचा –
नवले पुलावर कंटेनरचा ब्रेक फेल २०-२५ वाहनांना धडक ! ८ मृत्यू
अभियंत्याला चापटी मारणे माजी आमदार गीता जैन यांना भोवले
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीसाठी केंद्र-राज्य सरकार कटिबद्ध ; फडणवीस यांचे आश्वासन









