मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अनेक घडामोडी झाल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले.
यामध्ये २८ जानेवारी म्हणजेच अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी पदभार स्विकारेपर्यंत दरम्यानच्या काळात पक्षाकडून आयोगाला कोणताही पत्रव्यवहार झाला असेन तर तो अवैध ठरवण्याचे निर्देश दिले.१० मार्च रोजीचे पत्र सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.

सुनेत्रा पवार यांनी पाठवलेल्या या पत्रानुसार, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आणि अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या अधिवेशनात पक्षाच्या घटनेनुसार खासदार, आमदार तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर झाली.
सुनेत्रा पवार यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात अधिवेशनाचा तपशील, ठराव, निवडून आलेल्या सदस्यांची यादी तसेच पक्षाच्या घटनेची प्रत सादर केली आहे. यासोबतच पक्षाच्या घटनेत करण्यात आलेल्या दुरुस्तीची माहितीही आयोगाला दिली.
त्याचबरोबर, २८ जानेवारी ते पत्र जारी होईपर्यंतच्या कालावधीत पक्षाच्या नावाने कोणीही केलेले पत्रव्यवहार ‘रद्द’ समजावेत, अशी भूमिका मांडली. या भूमिकेमुळे त्या कालावधीत घेतलेल्या निर्णयांवर आणि अधिकृततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना न सांगता निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. १६ फेब्रुवारी रोजी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सह्यांचे एक पत्र आयोगाला देण्यात आले. त्यात अध्यक्षांच्या निधनामुळे कार्याध्यक्षांकडे म्हणजे पटेल यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार असल्याचे कळवण्यात आले होते. असा दावा रोहित पवार यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काय – काय घडामोडी घडल्या, याबाबत आपल्याकडे संपूर्ण माहिती आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांच्या विरोधात काय – काय कट कारस्थान रचले गेले, याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आहे, ते सगळे आपल्याला बोलावे लागेल, असा इशारा तटकरे यांनी दिला.
हे देखील वाचा –
बांगलादेशात बस पद्मा नदीत कोसळली ! २३ जणांचा मृत्यू
स्मार्टफोन झाला खूपच स्वस्त; लाँचनंतर पहिल्यांदाच किंमतीत मोठी कपात; किंमत एकदा पाहाच











