Assam BJP posts anti-Muslim ‘point-blank shot – आसाम भाजपाच्या अधिकृत एक्सवर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओवरून राजकीय वाद निर्माण झाला. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा रायफल हातात घेत अल्पसंख्याक मुस्लीम समुदायाच्या व्यक्तीवर नेम धरत आहेत, असे दिसते. या व्हिडिओला ‘पॉइंट ब्लँक शॉट’ असे शीर्षक दिले आहे. यावर काँग्रेसने जोरदार हल्लबोल केल्यानंतर ही पोस्ट एक्सवरून हटवण्यात आली. मात्र या व्हिडिओचे स्क्रीनशॉट आणि स्क्रीन-रेकॉर्डिंग अनेकांनी मोठ्या प्रमाणात शेअर करून व्हायरल केले.याबाबत भाजपाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.तर काँग्रेसने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना पदावरून हटवण्याची आणि सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केली .
काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या पोस्टवर टीका करत लिहिले की, आसाम भाजपाच्या अधिकृत हँडलने अल्पसंख्याकांना लक्ष्य करत, नेम धरल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. हे नरसंहाराचे आवाहन आहे. हे स्वप्न कट्टरपंथीय राजवटीने अनेक दशकांपासून बाळगले आहे. हा व्हिडिओ ट्रोल कंटेंट म्हणून दुर्लक्षित करण्यासारखा निरुपद्रवी व्हिडिओ नाही. हे पसरवलेले विष आहे आणि त्याचे परिणाम भोगावे लागतील. नरेंद्र मोदी हे याचा निषेध करतील किंवा त्याविरुद्ध कारवाई करतील अशी आशा नाही. परंतु न्यायव्यवस्थेने कारवाई केली पाहिजे आणि या प्रकरणात कोणतेही औदार्य दाखवले जाऊ नये.
काँग्रेसने एक्सवर लिहिले की, भाजपा आसामने प्रदेश एक्सवर व्हिडिओ पोस्ट केला. जो अल्पसंख्याकांच्या हत्येचा गौरव करतो. हा व्हिडिओ अत्यंत घृणास्पद आणि त्रासदायक आहे. त्याला ट्रोल कंटेंट म्हणून नाकारता येत नाही. हे मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि नरसंहाराचे आवाहन आहे. हे या फॅसिस्ट राजवटीच्या खऱ्या चेहऱ्याचे प्रतिबिंब आहे, ज्याने दशकांपासून हा द्वेष बाळगला आणि गेल्या ११ वर्षांत तो सामान्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, समाजात असंतोष आणि विष पसरवण्याच्या या कृत्याविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे. हे स्पष्ट आहे की पंतप्रधानांकडून याचा निषेध करण्याची आणि जबाबदारी निश्चित करण्याची कोणतीही अपेक्षा नाही. परंतु न्यायव्यवस्थेने ठामपणे पाऊल उचलले पाहिजे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या कृत्याचा निषेध करते आणि शांततेला धोका निर्माण करणाऱ्या आणि सामाजिक शत्रुत्व पसरवणाऱ्या अशा उघड हिंसाचाराच्या आवाहनांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे न्यायपालिकेला आवाहन करते.
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी व्हिडिओचे स्क्रीन-रेकॉर्डिंग शेअर करत म्हटले की, न्यायालये आणि इतर संस्था झोपल्या आहेत का?” काँग्रेसच्या केरळ हँडलवरूनही भाजपावर “अल्पसंख्याकांविरोधात उघड आवाहन” केल्याचा आरोप करण्यात आला. राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांनी या व्हिडिओला “संविधानाच्या छातीवर गोळीबार” असे संबोधले.
हे देखील वाचा –
महाशिवरात्रीला भीमाशंकर बंद ; विकास आराखड्याचा परिणाम
अजित पवारांच्या अपघातावर संशय ! रोहित पवारांची मंगळवारी प्रेस कॉन्फरन्स








