Ayodhya Saints Face Voter List Risk – अयोध्येतील अनेक साधूसंतांनी मतदार अर्ज भरताना पालक म्हणून गुरू आणि देवदेवतांची नावे लिहिल्याने त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धर्माचे राजकारण करणार्या भाजपासाठी हा मोठ्या चिंतेचा मुद्दा बनला आहे.
उत्तर प्रदेशात सध्या मतदारयाद्या पुनर्निरीक्षण मोहीम सुरू असून अयोध्या विकास प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात ६० वॉर्ड आहेत. अयोध्येची लोकसंख्या सुमारे २४.७ लाख इतकी आहे. शहरातील अनेक मंदिरे, मठ आणि आखाड्यांमध्ये राहणार्या साधू-संतांची संख्या १५,००० हून अधिक आहे. त्यामध्ये निर्वाणी, दिगंबर व निर्मोहीसह असे साधू-संतांचे अनेक आखाडे आहेत.
साधूंकडे भाजपाचा मुख्य मतदार म्हणून पाहिले जाते. त्यांनी भरलेले मतदार अर्ज मोठ्या प्रमाणात नाकारल्याने त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, अशी कबुली खाजगीत बोलताना भाजपा नेते देत आहेत. अनेक साधूंनी पालक म्हणून कौसल्या, दुर्गामाता आणि सीतामाई यांची नावे अर्जावर लिहिलेली आहेत. राज्यात आतापर्यंत प्राथमिक मतदार यादीतून सुमारे २.८९ कोटी नावे वगळण्यात आल्याची माहिती मिळत असून त्यात साधूंची नेमकी संख्या किती हे अद्याप अस्पष्ट आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिरुद्ध प्रताप सिंग म्हणाले की, मतदार अर्जांत पालकांची नावे नमूद करणे अनिवार्य असले तरी, मठ आणि मंदिरांमध्ये राहणाऱ्या साधूंच्या बाबतीत नियमात लवचिकता वापरली जात आहे. अर्जदाराची स्वाक्षरी हा पुरेसा पुरावा मानली जात आहे.
जे संत त्यांच्या आईचे नाव देऊ शकत नाहीत त्यांना त्या रकान्यात लिहिलेल्या नावाशी संबंधित कागदोपत्री पुरावे सादर करण्याची आवश्यकता नाही. भरलेले मतदार फॉर्म उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे छाननीसाठी पाठवले जातील. तिथे २००३ च्या मतदारयादीशी ते जुळवून पहिले जातील.
त्यात विसंगती आढळली तर संबंधित मतदारांना दुरुस्तीसाठी नोटिसा बजावल्या जातील. यामुळे भाजपाची मात्र चिंता वाढली असून मतदार यादी अर्जांबाबत लवचिक धोरण असावे, अशी पक्षाची भूमिका आहे. या याद्यांमुळे अयोध्येत धार्मिक संघर्ष होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा –









