Badlapur Local Delay – सलग तिसऱ्या दिवशी लोकल ट्रेन वेळेवर न आल्याने बदलापूर स्थानकावर प्रवाशांचा संताप उसळला. अर्धा तास उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घालून जाब विचारला.
दररोज सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांना कामावर उशीर होतो आहे. या समस्येवर रेल्वे प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने प्रवाशांचा रोष वाढत चालला आहे.
दररोज अर्धा अर्धा तास ट्रेन लेट असतील, तर आम्ही वेळेत कामावर कसे पोहोचणार? असा सवाल संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरला विचारला.
बदलापूरची लोकसंख्या आता नऊ लाखांच्या पुढे गेली असून, त्या मानाने लोकल फेऱ्या अत्यल्प असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. अर्धा ते पाऊण तासानेच स्थानकावर लोकल उपलब्ध असते, त्यातही गाड्या उशिरा धावल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि गोंधळ निर्माण होतो.
रेल्वे प्रवासी संघटनांनी अनेक वेळा लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन लोकल फेऱ्या वाढवाव्यात आणि वेळेचे पालन करावे, अशी मागणी केली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
हे देखील वाचा –
वादानंतर ‘मनाचे श्लोक’ सिनेमाचं नावं बदलले! मृण्मयी देशपांडेचा चित्रपट आता ‘या’ तारखेला होणार रिलीज