Bawankule Warn’s Ajit Pawar – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवार गट शरद पवारांशी युती करून भाजपा विरोधात मैदानात उतरला आहे. यावेळी प्रचारात पालिकेतील भाजपा हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असून, कंत्राटदारांशी संगनमत करीत टक्केवारी खात असल्याची टीका अजित पवार प्रत्येक सभेत करीत आहेत.
यामुळे भाजपा नेतृत्व भडकले आहे. आज भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अजित पवार यांना थेट धमकीच दिली. बावनकुळे म्हणाले की, 70 हजार कोटींची सुनावणी अजून सुरू आहे. निकाल लागायचा आहे. मागचे पान उलटले तर त्यांना बोलता येणार नाही. त्यामुळे समन्वय समितीत जे ठरले त्यानुसार अजित पवार इथून पुढे वागतील अशी आशा आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि आशिष शेलार यांनीही आज अजित पवार यांना ठणकावले.
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. भाजपा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाक्युद्ध अधिक तीव्र होत असतानाच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा निकाल अद्याप प्रलंबित असल्याची आठवण करून देत अजित पवारांना थेट इशारा दिला आहे. सत्तेत असूनही अजित पवार वारंवार भाजपावर टीका करत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपाचे इतर नेतेही अजित पवारांना फटकारत आहेत.
मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढताना दिसत आहे. या वादाची ठिणगी पुण्यात अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पडली. त्यांनी भाजपाच्या काही धोरणांवर आणि स्थानिक नेतृत्वावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. केंद्र आणि राज्यातून आम्ही योजना आणतो, पण स्थानिक नेतृत्व त्या योजनांची अंमलबजावणीच करत नाही असे ते म्हणाले.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही इतकी वर्षे पालकमंत्री होता, मग भरीव काम का झाले नाही? कोणी आम्हाला कामाबद्दल प्रश्न विचारत असेल, तर त्यांनी आधी आरशात पाहावे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही जर मागची पाने चाळली, तर अजितदादांना बोलताही येणार नाही. 70 हजार कोटींच्या प्रकरणाची सुनावणी अद्याप न्यायालयात सुरू आहे. निकाल लागलेला नाही. अजितदादा प्रगल्भ नेते आहेत.
एका छोट्या महापालिका निवडणुकीसाठी अशा बाबी बाहेर काढून महायुतीत मनभेद निर्माण करणे योग्य नाही. बोलता खूप येईल, पण ही ती वेळ नाही. यापुढे समन्वय समितीत ठरले ती मर्यादा ते पाळतील अशी आशा आहे. भाजपा नेते आशिष शेलारही अजित पवारांवर संतापून म्हणाले की, आम्ही सावरकरांचे भक्त आहोत आणि सावरकरी विचारांवर चालणारे लोक आहोत. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील. सोबत आलात तर सोबत, अन्यथा तुमच्याविना किंवा विरोधात गेलात, तरी त्याला आम्ही सामोरे जाऊ.
या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी किमान समान कार्यक्रम ठरवून महायुती एकत्र आली आहे. मात्र, कोणताही पक्ष आपल्या विचारधारेवर तडजोड करणार नाही. भाजपा त्यांच्या विचारधारेनुसार काम करील, तर राष्ट्रवादी शिव-शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करत राहील. निवडणुकीचा काळ असल्याने अशा प्रकारची विधाने होत असतात.
ही भूमिका स्थानिक पातळीपुरती मर्यादित आहे. याचा राज्यातील महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. महायुती कायमस्वरूपी असून पुढील काळातही ती मजबूत राहील. आगामी काळात एकमेकांवरील टीका टाळून समन्वयाने काम केले जाईल. येत्या काळात काही विषयांवरील वक्तव्य टाळली जातील. प्रचाराचे सहा दिवस बाकी आहेत. या सहा दिवसांत अजित पवार अधिक प्रखरपणे भाजपा विरोधात बोलतात की, राज्य पातळीवरील आपला सरकारमधील सहभाग जपण्यासाठी नमते घेतात याकडे लक्ष राहील.
भाजपा नेत्यांनी केलेल्या आक्रमक वक्तव्यानंतर अजित पवार यांनी, मी महापालिकेतील कारभाराविषयी बोलत होतो. भाजपावर कधीही कुठे बोललेलो नाही असे स्पष्ट करत भाजपासोबतच्या राजकीय वादावर पडदा टाकला.
ते म्हणाले की, सध्या महापालिका निवडणुका आहेत. त्यामुळे स्थानिक मुद्यांवर चर्चा होणारच. देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार चांगले काम करत आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस, मी आणि शिंदे चांगले काम करत आहोत. त्याबाबत काही बोललेलोच नाही. मी 25 वर्षे येथील महापालिकेत काम केलेले आहे. पण मागील 9 वर्षांत जो नियोजनशून्य कारभार सुरू आहे, कर्जबाजारीपणा सुरू आहे, विकासकामे रखडलीत त्यावर तर बोलणारच ना? शेवटी मागील 9 वर्षांत जे व्हायला हवे होते ते होताना दिसले नाही. हेच तर मी बोलतो आहे. त्यामुळे येथे जे प्रश्न निर्माण झालेत ते सोडवायचे असतील तर आम्ही दिलेल्या सर्व उमेदवारांना निवडून द्या. त्यासाठी सर्वांनी एकोप्याने कामाला लागा, असे आज मी कार्यकर्त्यांना सांगितले.
मुळात तुम्ही मी जे बोललो ते चुकीच्या पद्धतीने पुढे आणले आणि त्यामुळे हे घडणे स्वाभाविकच होते. पण यापुढे महापालिका निवडणुकीशी संबंधित मुद्यांवर चर्चा होईल. बाकी कुणी काही विधान केले त्यावर भाष्य करणार नाही. निवडणुका झाल्यावर मी त्यावर बोलेन. अजून माझ्या पिंपरीत दोन-तीन सभा आहेत. तिथेही मी हेच सांगणार आहे आणि कृपया आमच्यात अंतर निर्माण होईल, असे तुम्ही काही विचारू नका.
स्थानिक पातळीवरील प्रश्नावर भाजपाकडून प्रचारादरम्यान दिल्या जाणार्या संभाव्य प्रत्युत्तराविषयी विचारले असता ते म्हणाले की, त्यांनी त्यांची भूमिका मांडावी. मी माझी भूमिका मांडेन. शेवटी जनता काय तो फैसला करेल ना? मी पूर्वी महाविकास आघाडीत असतानाही अशा पद्धतीने निवडणुका लढलो होतो. तिथे आम्ही राज्यात एकत्र होतो. पण एकमेकांविरुद्ध लढत होतो. आताही तसेच आहे. प्रत्येक पक्ष आपली भूमिका मांडेल आणि जनता त्यातून आपला निर्णय घेईल.
हे देखील वाचा –
Mohammed Shami : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला निवडणूक आयोगाची नोटीस; ‘हे’ आहे कारण
ड्रग्ज, रिसॉर्ट आणि सत्तेची सावली! सावरी प्रकरणात ‘शेड’ची गोष्ट खोटी ठरतेय?











