BJP Workers Protest Outsider Candidates – महापालिका निवडणुकीतील उमेदवारी वाटपामुळे भाजपामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणार्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून उपरे आणि नवख्या उमेदवारांना संधी दिल्याने छत्रपती संभाजीनगर, अकोला, पुणे, चंद्रपूरमध्ये कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
यावेळी पैसे घेऊन हे तिकीट वाटप झाल्याचा आणि पक्षात अनेक वर्षे काम करूनही डावलल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी व उमेदवारांनी पक्षावर केला. त्यांच्या भावना अतिशय तीव्र झाल्या होत्या.आज सकाळी भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर भाजपाचे नेते कार्यालयात बैठक घेत होते.
यावेळी इच्छुक उमेदवारांनी मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही नेत्यांनी आपल्या कक्षात जाऊन दरवाजे बंद केले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळादरम्यान तिकीट नाकारल्याने संतप्त झालेल्या एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तिच्या हातातून पेट्रोलची बाटली काढून घेतली.
गोंधळ वाढत असल्याचे पाहून मंत्री अतुल सावे मागच्या दाराने कार्यालयातून बाहेर पडले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.प्रभाग क्रमांक 20 मधील इच्छुक उमेदवार दिव्या मराठे म्हणाल्या की, आम्ही पक्षासाठी 18 वर्षे प्रामाणिकपणे काम केले. आंदोलनांत सहभाग घेतला, 18 गुन्हे अंगावर घेतले, उपाशी राहून पक्षाचे काम केले. तरीही आम्हाला उमेदवारी नाकारली.
त्यामुळे मी आता पक्षाच्या विरोधात कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार आहे. माझ्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या एका कार्यकर्त्याच्या पत्नीला तिकीट दिले आहे. मागील निवडणुकीतही माझे तिकीट अचानक कापले होते. मग आम्हाला पक्षाचे काम का सांगितले जाते? मुख्यमंत्र्यांसाठी राख्या जमा करायला सांगतात, पण उमेदवारी देताना अन्याय करतात. हा अन्याय किती काळ सहन करायचा? जर जुन्या कार्यकर्त्याना डावलले जात असेल तर अतुल सावे आणि भागवत कराड तुम्हीदेखील पायउतार व्हा. आता आम्ही या भाजपा उमेदवाराला पाडल्याशिवाय राहणार नाही.
प्रभाग 19 मधून इच्छुक असलेल्या संध्या कापसे म्हणाल्या की, नेहमी आमच्या कामाची प्रशंसा होते. मात्र तिकीटवाटप करताना बाहेरच्यांना का आणले जाते? सर्वसाधारण प्रवर्गाची जागा असताना ओबीसी महिलेला आयात करून निष्ठावंतांचा गळा घोटला जात आहे. प्रभाग 22 मधील सुवर्णा भदाडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. यावेळी त्यांना भोवळ आली होती. त्या म्हणाल्या की, लहान मुले असताना घरदार सोडून पक्षासाठी काम केले, लाखो रुपये खर्च केले.
मात्र आज गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीट दिले जात आहे. पक्षामुळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. भंडारी म्हणाले की, मी नोकरी सोडून भाजपासाठी काम केले. 20-25 वर्षे पक्षाची सेवा करूनही दोन महिन्यांपूर्वी बाहेरून आलेल्यांना तिकीट दिले जात आहे. आमच्यात काय कमी आहे, हे नेतृत्वाने स्पष्ट करावे.
माजी नगरसेविका लता दलाल गंभीर आरोप करत म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघात पैशांच्या जोरावर तिकीट दिले. त्यामुळे मी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. सध्या भाजपा पैशावर चालत आहे. इतर शहरातही भाजपा विरोधात असाच सूर होता.
या गोंधळानंतर मित्रपक्ष असणार्या आरपीआय आठवले गटाने कार्यालयात जाऊन गदारोळ केला. भाजपाने आरपीआयला उमेदवारी न दिल्याने एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

जनतेची सेवा करण्यासाठी वादंग पाहून गहिवरून आले
आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांनी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी अभूतपूर्व गोंधळ घातला. कुणी उपोषणाला बसले, कुणी गाड्यांचा पाठलाग केला, कुणी चक्कर येईपर्यंत आरडाओरडा केली, कुणी अपक्ष अर्ज भरला. सर्वच पक्षात हा गोंधळ घातला गेला. विशेष म्हणजे ‘जनतेची सेवा आणि विकास’ करण्यासाठी या उमेदवारांनी जीवाचा इतका आटापिटा केलेला पाहून महाराष्ट्राच्या जनतेला गहिवरून आले!! त्यांचा सेवेचा अट्टाहास इतका होता की, पुढील निवडणुकीसाठी कुणी थांबायला तयार नव्हते.
ज्यांना तिकीट मिळाले तेही निवडून येऊन जनतेची सेवा करण्यास आतूर आहेत. गेली पाच ते दहा वर्षे निवडणुकाच न झाल्याने त्यांच्या सेवाकार्यात खंड पडला होता. पुण्य कमाईची तिजोरी रिती झाली होती. आता निवडून आल्यावर सरलेल्या रिकाम्या वर्षांची भरपाई करण्यास पक्ष आणि नगरसेवक सज्ज आहेत.
हे देखील वाचा –
रोहित-विराटवर कसोटी क्रिकेट सोडण्यास दबाव? माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाचा दावा …
रेल्वे वेळापत्रकात १ जानेवारीपासून मोठा बदल; जाणून घ्या तुमच्या प्रवासाचा अचूक वेळ..









