BJP–Shinde Group Registration Delayed – शिंदेसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज गटनोंदणीसाठी जाणार होते. परंतु ही गटनोंदणी रखडली असून नगरसेवकांना आपापल्या प्रभागात जाण्यास सांगण्यात आले. याबाबतीत एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून आता दोन्ही पक्षांचे नगरसेवक आता एकत्र गटनोंदणीसाठी जाणार आहेत. मात्र एकत्र गेले तरी गटनोंदणी स्वतंत्र की संयुक्त हे अजून स्पष्ट झालेले नाही.
भाजपा आणि शिंदे सेना वगळता मुंबईतील सर्व पक्षांनी त्यांच्या नगरसेवक गटाची नोंदणी केली आहे. मुंबई महापालिका निवडणूक भाजपा-शिवसेना युती म्हणून एकत्र लढल्याने संयुक्त गटनोंदणी करण्याची भाजपची इच्छा आहे. मात्र, अशी नोंदणी झाल्यास भाजपासोबत पाच वर्षे फरपट होईल, असे शिंदे सेनेचे मत असून स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय यामुळेच घेण्यात आला होता. त्यासाठी आज दुपारी गटनोंदणी करण्याचे ठरलेही होते. मात्र, अचानक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाली आणि त्यानंतर गटनोंदणी पुढे ढकलण्यात आली.
आज झालेल्या चर्चेनुसार दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी आता एकत्र जाऊन गटनोंदणी करण्याचे ठरवले असून भाजपा- शिंदे सेनेकडून सर्व 118 नगरसेवकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. मात्र एकत्रित जाणे झाले तरी गट नोंदणी स्वतंत्र की संयुक्त हे अजून स्पष्ट झालेले नाही. मुंबई महापालिकेतील विशेष समित्या तसेच वैधानिक समित्या यांच्या सदस्य संख्येवरून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची स्वतंत्र नोंदणी करण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई महापालिकेचे महापौरपद, उपमहापौरपद तसेच विविध वैधानिक आणि विशेष समित्यांचे अध्यक्षपद व सदस्य संख्येवरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये याआधीही चर्चा सुरू होती. दोन्ही पक्षांचे लक्ष स्थायी समितीकडे आहे. स्थायी समितीत सत्ताधारी आणि विरोधकांची सदस्यसंख्या समान आहे. तर शिक्षण समितीचे अध्यक्ष पदसिद्ध सदस्य असल्याने सत्ताधारी गट केवळ एका सदस्याने आघाडीवर आहे.
हे देखील वाचा –
शेतकऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ; भिवंडीत भव्य मल्टी प्रॉडक्ट हब उभारणीला मंजुरी..
मुंबई–नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडले जाणार; मेट्रो लाईन–८ ला मंजुरी









