C.R. Patil’s Shivaji Maharaj Remark – छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते अशी मुक्ताफळे भाजपाचे केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत आर. पाटील यांनी उधळली आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.
गुजरातमधील भाजपाचे चाणक्य अशी ओळख असणार्या सी. आर. पाटील यांनी पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, मला सांगताना आनंद होतोय, छत्रपती शिवाजी महाराजही पाटीदार समाजाचे होते आणि त्यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना करण्याचे यशस्वी प्रयत्न केले.
मंत्री महोदयांच्या या वक्तव्यावर इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी लगेच प्रतिक्रिया देताना सांगितले की, हे विधान राजकीय हेतूने केले गेलेले असून, हा एक अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या समाजाचे, जातीचे आणि धर्माचे होते असला विचार करणे हाच मोठा मूर्खपणा आहे. शिवाजी महाराज सर्वांचे होते. मात्र इतिहास सांगतो की, ते मराठा होते. त्यांनी अनेक पत्रांमध्ये तसा उल्लेखही केला आहे.
हे स्पष्ट असताना आणि इतिहास स्पष्ट असताना या मंडळींनी इतिहासाचे वाचन करण्याची गरज आहे. नाहीतर महापुरुषांबद्दल अशी बेधडक वक्तव्य करण्याचे धाडस त्यांनी केले नसते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विधानाचा निषेध केला असून, शिवाजी महाराजांची वंशावळ संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे चुकीचे विधान करणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले.
उबाठाचे खा. संजय राऊत यांनी म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे यांनी, मुळात छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर त्यांना महाराष्ट्रात येऊन गडकोट फिरावे लागतील आणि मग ते कोणत्या समाजाचे होते, काय होते ते बोलावे. महाराजांचा इतिहास आयुष्यात आत्मसात करायचा नाही, त्यांच्यासारखे काम करायचे नाही हा या लोकांचा कुचकामीपणा आहे’, असे सांगितले.
हे देखील वाचा –
Mohammed Shami : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला निवडणूक आयोगाची नोटीस; ‘हे’ आहे कारण
महायुतीत मतभेदांची आग! भाजप–राष्ट्रवादी आपापसात भिडले, बावनकुळेंनी सिंचन घोटाळ्याचा दिला थेट इशारा











