CB raid DCM Pawar’s Advisor Arora office – आज पालिका प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पुणे पोलीस कंट्रोलला पैसे वाटप होत असल्याचा केवळ एक फोन आला आणि तेवढ्यावर पुण्याच्या क्राईम ब्रँचने तत्काळ अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या पुण्यातील कार्यालयावर धाड टाकली. केवळ तोंडी तक्रारीवर इतक्या तत्परतेने धाड टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. अजित पवार यांच्यावर दबाव टाकण्यासाठी हा प्रकार झाला हे उघड आहे.
ही धाड पुणे पोलिसांनी टाकली नाही तर क्राईम ब्रँचने टाकली. पण धाड टाकल्यानंतर काही तासातच या धाडीत काहीच आढळून आले नाही, असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केले. यामुळे अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत. या कार्यालयातील कागदपत्रे नेण्यात आली अशी चर्चा आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सुरुवातीला वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे गेलेच नसल्याचा दावा केला. पण त्यानंतर पुढे आलेल्या माहितीनंतर अधिकारी पाहणी करण्यासाठी गेले होते असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली. पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेत अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीच्या कार्यालयावर जाऊन या तक्रारीची खातरजमा केली. या ठिकाणी पोलिसांना काहीही प्रतिकूल आढळून आले नाही. त्यामुळे कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा दावा अमितेशकुमार यांनी केला.
डिझाईन बॉक्स या कंपनीचे मालक नरेश अरोरा हे अजित पवार यांचे राजकीय सल्लागार आहेत. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे गुलाबी जॅकेट, त्यांची बदललेली भाषाशैली, लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम हे सर्व नियोजन अरोरा यांचे होते.
पालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरीमध्ये भाजपासोबत फिस्कटल्यावर अजित पवार यांनी सातत्याने महेश लांडगे, मुरलीधर मोहोळ यांच्यासह स्थानिक भाजपा नेत्यांवर भ्रष्ट कारभाराची सडकून टीका केली.
अजित पवार प्रत्येक भाषणात भाजपावर घणाघात करीत म्हणायचे की 70 लाखांचा पादचारी पूल 7 कोटींना कसा गेला? 12 कोटींचे सॉफ्टवेअर 120 कोटींना कोणी घेतले? 666 कोटींचे 950 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, पण 70 टक्के बंद का आहेत? 42 कोटींचा ई-लर्निंग प्रकल्प का बंद पडला?
7 कोटी खर्च करूनही एकही झाड प्रत्यक्षात का दिसत नाही? या प्रश्नांची उत्तरे आजपर्यंत कुणी दिलेली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने कॉन्ट्रॅक्टर, टँकर माफिया किंवा महानगरपालिका लुटणारे उमेदवार दिलेले नाहीत. चांगले उच्चशिक्षित, महिला सक्षमीकरण, शिक्षण व आरोग्यासाठी सातत्याने काम करणारे तसेच स्वच्छता, सुरक्षितता व स्वावलंबनासाठी झटणारे उमेदवार आम्ही उभे केले आहेत.
मागील नऊ वर्षे यांनी नुसती वाट लावली. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला लीडर हवा की डीलर अशी साद त्यांनी मतदारांना घातली होती. आज तर त्यांनी महेश लांडगे यांचा जकात नाक्यावर भंगार गाड्या फिरवणारा नासका आंबा असा उल्लेख केला होता. या आरोपांबाबत भाजपाकडून वेळोवेळी नापसंती व्यक्त करूनही हे शेवटपर्यंत थांबले नाही.
या सार्या घडामोडीमुळे आज अरोरावर धाड पडली असे म्हटले जात आहे. या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी म्हटले की पैसे वाटपाची तक्रार आल्यावर चौकशीचा अधिकार खरेच क्राईम ब्रँचकडे जातो का? हे पाहावे लागेल. अशा पध्दतीने मुस्कटदाबी करत असतील तर जनता उद्याच्या निवडणुकीत याचे उत्तर देईल.
अशा पद्धतीने जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला कुणी रोखत असेल तर ते योग्य आहे का? अशा कुठल्याही कारवाईने राष्ट्रवादीला कुणी रोखू शकत नाही. राष्ट्रवादी हा पक्ष जनतेच्या आशिर्वादावर चालणारा पक्ष आहे. कितीही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही पुढेच जाताना दिसू.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार म्हणून नरेश अरोरा चर्चेत आहेत. 2024 आणि 2026 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कंपनीवर अजित पवार गट नेत्यांच्या सोशल मीडिया आणि प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची कंपनी ग्राऊंड लेव्हल डेटा गोळा करणे, मतदारांचे वर्तन तपासणे, सोशल मीडिया रणनीती ठरवणे आणि जाहिरातींचे व्यवस्थापन करणे यांसारखी कामे करते. आज त्यांच्या कार्यालयातून पैशांचे वाटप होत असल्याची तक्रार आल्याचे सांगत त्यांच्यावर धाड
टाकण्यात आली.
नरेश अरोरा या धाडीबद्दल म्हणाले की, पुण्यातील आमच्या डिझाईन बॉक्स्ड कार्यालयात क्राईम ब्रँचचे काही लोक आले होते. मी आणि इतर वरिष्ठ कार्यालयात नव्हते. जे कर्मचारी होते त्यांच्याकडे चौकशी केली. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे काय काम होते, याबाबत माहिती विचारली. आमच्या कर्मचार्यांकडे असलेली माहिती त्यांनी क्राईम ब्रँचला दिली. त्यानंतर त्यांनी काही कागदपत्रे मागितली. त्यावेळी कर्मचार्यांनी वरिष्ठ उपस्थित नसल्याने कागदपत्र देण्यास नकार दिला.
अरोरांच्या पाठीशी अजित पवार ठाम
या धाडीनंतर अजित पवार यांनी एक्स पोस्ट केली की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्यरत असलेले नरेश अरोरा व त्यांची संस्था ’डिझाईन बॉक्स्ड’ यांच्या पुणे कार्यालयात आज क्राईम ब्रँचचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशाने उपस्थित झाले होते. संबंधित अधिकार्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक माहिती दिली आहे.
या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्पष्ट करू इच्छितो की, या संपूर्ण विषयात पक्ष हा अरोरा व त्यांची संस्था ’डिझाईन बॉक्स्ड’ यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायद्याचा सन्मान करतो आणि सर्व वैधानिक प्रक्रियांना सहकार्य करण्यावर विश्वास ठेवतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्यरत असलेले श्री. नरेश अरोड़ा व त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पुणे कार्यालयात आज क्राईम ब्रँचचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशाने उपस्थित झाले होते.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 13, 2026
संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती माहिती देण्यात आली असून…
हे देखील वाचा –
अमित शाह भेटीनंतर मुंडेंच्या राजकीय हालचालींना वेग; बीडमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे









