मुंबई – गडचिरोली येथील महाराष्ट्र शासनाच्या (state goverment) हत्ती संगोपन केंद्रातील हत्ती आणि विटा येथील श्री नाथ मठातील वनतारा रेस्क्यू सेंटरमध्ये (vantara) नेलेले हत्ती गायब असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. आज महादेवी हत्तीणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadanvis) यांच्या उपस्थितीत मंत्रालयात एक बैठक पार पडली. या बैठकीला राजू शेट्टी यांच्यासह कोल्हापूर परिसरातील अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी हत्ती पालनासाठी योग्य यंत्रणा राज्यात उभारून महादेवीला परत आणण्यासाठी कोर्टाला विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीनंतर राजू शेट्टी म्हणाले की, महादेवी ही हत्तीण पुण्यात असताना ९ वैद्यकीय चाचण्यांमध्ये सुदृढ ठरली, पण ४८ तासांच्या प्रवासानंतर आजारी कशी काय झाली? तिला अचानक संधिवात आणि फ्रॅक्चर कसे झाले? मग वेगवेगळे नऊ अहवाल देणारे आपल्या महाराष्ट्र शासनाचे अधिकारी चुकीचे आहेत की काहीही करून आम्हाला हत्ती पाहिजे म्हणून तिला घेऊन जाणारे खोटे आहेत. यावर सरकारने वनताराकडून उत्तर मागावे, अशी मागणी आम्ही केली. पेटा ही संस्था आर्थिक अमिषापोटी वनतारा येथे पाळीव हत्ती पोहोचवण्याची सुपारी घेत आहे. गडचिरोली येथील हत्ती संगोपन केंद्रातील काही हत्ती वनतारा येथे हलवले आहेत. त्याचप्रमाणे विटा येथील श्री नाथ मठातील एक हत्ती २०२३ साली वनतारा येथे हलवण्यात आला. मात्र, त्यांच्या बाबतीत कोणतीही ठोस माहिती, व्हिडीओ किंवा आरोग्य अहवाल उपलब्ध नाही. ही गोष्ट अत्यंत संशयास्पद आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितले की ३ ते ४ हत्ती वनतारामध्ये नेले गेले असून आता ते हयात नाहीत. जर महादेवी हत्तीणीची तब्येत सुधारत चालल्याचे व्हिडीओ वनतारा प्रसारित करू शकतो, तर इतर हत्तींबाबत माहिती का लपवली जाते? न्यायव्यवस्थेची दिशाभूल करून हत्ती महाराष्ट्राबाहेर नेले जात आहेत. ही बाब केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. त्रिपुरा, आसामसारख्या सीमावर्ती राज्यांतील हत्तींनाही लक्ष्य केले जात आहे. पेटा आणि वनतारा या संस्था प्राण्यांचा छळ करत आहेत.
महादेवी हत्तीणीसाठी
सरकार याचिका करणार
माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीसाठी साठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, माधुरी उर्फ महादेवी हत्तीण गेली ३४ वर्षे नांदणी मठात आहे. ती हत्तीण पुन्हा मठात यावी, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. यासाठी नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी आणि राज्य सरकार हस्तक्षेप करील . राज्य सरकारकडून हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांच्या समावेशासह विशेष टीम तयार केली जाईल. तिच्या आरोग्याची, आहाराची आणि निवाऱ्याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. रेस्क्यू सेंटर, आहार, आरोग्य या सर्व बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला शासन आपल्या याचिकेतून आश्वस्त करील . सरकार नांदणी मठाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहे.