पुणे- पुणे महापालिकेचे (PMC) आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishor Ram) यांच्या बंगल्यातून लाखोंच्या महागड्या वस्तू गायब झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यांचा हा बंगला शिवाजी नगरमधील उच्चभ्रू मॉडेल कॉलनीतील (model colony) चित्तरंजन वाटिकेजवळ आहे. आयुक्तांचा तब्बल दीड एकरमध्ये असलेला बंगला सीसीटीव्ही आणि २४ तास सुरक्षारक्षकांच्या देखरेखीखाली असतो. या परिसरात काही आमदार आणि उद्योजक वास्तव्यास असल्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. तरीही या बंगल्यातून चार एसी, झुंबर, ऐतिहासिक चित्रे, पितळी दिवे, दोन एलईडी टीव्ही, कॉफी मेकर, वॉकीटॉकी सेट, चिमणीसह किचन टॉप, वॉटर प्युरिफायर यांसह अनेक महत्त्वाच्या वस्तू गायब झाल्या आहेत. नवल किशोर राम यांनी महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्याला दोन महिने होत आले आहेत. त्याआधी डॉ. राजेंद्र भोसले या बंगल्यात वास्तव्यास होते. भोसले यांच्या बदलीनंतर नवल किशोर राम यांना बंगला हस्तांतरित करताना संबंधित खात्यांनी घराची पाहणी केली, त्यावेळीच या वस्तू गायब असल्याचे लक्षात आले. यानंतर काही आवश्यक वस्तू महापालिकेने तातडीने खरेदी करून पूर्तता केली. मात्र उर्वरित वस्तूंसाठी सुमारे २० लाख रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत नवल किशोर राम म्हणाले की,या बंगल्याची जबाबदारी भवन विभागाची आहे.त्यामुळे येथील साहित्य कुठे गेले हे पाहणे त्यांचे काम आहे. त्यामुळे याबाबत संबधित अधिकार्याची चौकशी केली जाईल,त्यातून सर्व माहिती समोर येईल.
