Home / News / Fire at Sayaji Shinde’s Devarai : अभिनेते  सयाजी शिंदे यांनी उभारलेल्या देवराईला आग ! शेकडो झाडे जळाली

Fire at Sayaji Shinde’s Devarai : अभिनेते  सयाजी शिंदे यांनी उभारलेल्या देवराईला आग ! शेकडो झाडे जळाली

Fire at Sayaji Shinde’s Devarai – बीड जिल्ह्यातील पालवन येथे उभारलेली देवराई हा प्रसिद्ध अभिनेते व पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांच्या...

By: Team Navakal
Fire at Sayaji Shinde’s Devarai
Social + WhatsApp CTA

Fire at Sayaji Shinde’s Devarai – बीड जिल्ह्यातील पालवन येथे उभारलेली देवराई हा प्रसिद्ध अभिनेते व पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या पर्यावरण संवर्धन उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा प्रकल्प मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी आणि नैसर्गिक जंगलनिर्मितीसाठी राबवण्यात आला आहे.

याच देवराईला आज रात्री ९ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत शेकडो झाडे जळाली आणि अनेक झाडांना आगीची झळ बसल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते.मात्र एवढ्या झाडांना अचानक आग कशी लागली याचे कारण अस्पष्ट आहे.दरम्यान नाशिकमधील तपोवन वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाला सयाजी शिंदे यांनी पाठिंबा दिल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.त्यामुळे या अचानक लागलेल्या आगीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.


या आगीबाबत अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले की,आग कदाचित देवराईच्या बाजूला लागली असावी. परंतु ती आग देवराईत पसरण्याची शक्यता आहे. आपल्याकडे वणवा पेटल्यावर विझवण्याची सोय नाही, झाडे लावण्याची आपल्याकडे उदासीनता आहे, कागदावर आपण सतत झाडे लावली असे दाखवत असतो.

परंतु जंगले जगली नाही तर माणसाने जगायचे कसे हा प्रश्न आपल्यासमोर नक्कीच निर्माण होणार आहे. यापूर्वी याठिकाणी आग लागली होती. ज्याठिकाणी एकही झाड नव्हते तेथे १ लाख झाले लावली. मात्र लोक तेथे सिगारेट, खाण्याचे पदार्थ घेऊन जातात, कचरा टाकतात, त्याठिकाणी दारूच्या बाटल्या सापडतात. ही वनविभाग आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. परंतु हे माणसाने माणसासाठी निर्माण केलेले संकट आहे.यापूर्वीही याच देवराईला फेब्रुवारी २०२२ मध्ये झाडांना आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी सुमारे २ एकर परिसरातील झाडांचे नुकसान झाले होते.

देवराई म्हणजे काय ?

देवराई म्हणजे पारंपरिक पद्धतीने जपलेले पवित्र जंगल. या संकल्पनेनुसार झाडांची तोड केली जात नाही, तर निसर्गाला त्याच्या नैसर्गिक प्रक्रियेनुसार वाढण्याची संधी दिली जाते. पालवन देवराईही याच तत्त्वावर आधारित आहे.

सह्याद्री देवराई उपक्रमाची सुरुवात २०१६ साली झाली. सयाजी शिंदे यांनी दिवाडी (ता. बीड) येथे पहिली देवराई उभारून या चळवळीचा प्रारंभ केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पालवनसह बीड जिल्हा व महाराष्ट्रातील विविध भागांत देवराई प्रकल्प विकसित करण्यात आले. पालवन देवराईची उभारणीही २०१६–२०१७ च्या सुमारास सुरू झाली.या प्रकल्पाअंतर्गत वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब, आवळा, जांभूळ, करंज, बहावा अशा देशी व स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही झाडे कमी पाण्यात तग धरतात व जैवविविधतेस पोषक ठरतात.

पालवन देवराई प्रकल्पात स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवक, पर्यावरणप्रेमी आणि वनविभाग यांचा सक्रिय सहभाग आहे. लोकसहभागामुळे हा उपक्रम केवळ वृक्षलागवड न राहता एक पर्यावरणीय लोकचळवळ बनला आहे.या देवराईमुळे जमिनीची धूप थांबते, पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजलपातळी वाढते, तसेच पक्षी, प्राणी व कीटकांना नैसर्गिक अधिवास मिळतो. परिसरातील तापमान संतुलित राहण्यास मदत होते आणि पर्यावरणीय समतोल साधला जातो.

पालवन देवराई प्रकल्प हा मराठवाड्यातील पर्यावरण पुनरुज्जीवनाचा एक आदर्श नमुना मानला जात असून, भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत निसर्गसंपदा निर्माण करण्याच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा आहे.


हे देखील वाचा – 

local bodies election: 57 स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून

 युतीवर नाराजी असली तरी निवडणूक महत्त्वाची – सुप्रिया सुळे

 पाकिस्तानी एअरलाइन्सची ४८२ दशलक्ष डॉलरमध्ये विक्री

Web Title:
संबंधित बातम्या