Govind Pansare Murder Case : कॉम्रेड गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर गायकवाड (Sameer Gaikwad) याचा आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सांगली (Sangli) येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पहाटेच्या सुमारास उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
कॉम्रेड गोविंद पानसरे हे ज्येष्ठ डाव्या विचारांचे नेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते होते. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर (Kolhapur) येथील त्यांच्या घराजवळ पानसरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात १६ सप्टेंबर २०१५ रोजी विशेष तपास पथकाने सांगली येथून समीर गायकवाड याला संशयित म्हणून अटक केली होती.
२०१६ मध्ये गायकवाडने उच्च न्यायालयात (High Court)जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर २०१७ मध्ये त्याने सत्र न्यायालयात (Sessions Court) धाव घेतली, जिथे त्याला जामीन मंजूर करण्यात आला. या जामिनाविरोधात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता, मात्र उच्च न्यायालयानेही तो फेटाळला होता.पानसरे यांच्या पत्नी उमाताई पानसरे (Umatai Pansare)यांनी ओळख परेडमध्ये गायकवाडला हल्लेखोर म्हणून ओळखले नसल्याने त्याला जामीन मिळाल्याचे न्यायालयीन प्रक्रियेत नमूद करण्यात आले होते.
या हत्याकांडाशी संबंधित सर्व १२ संशयितांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. समीर गायकवाड गेल्या चार वर्षांपासून पानसरे हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर होता. जामीन मिळाल्यानंतर तो सांगलीतील विकास चौक (Vikas Chowk)परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होता.
गोविंद पानसरे कोण होते ?

कॉम्रेड गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ डाव्या विचारांचे नेते, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते (social activist)आणि अभ्यासू लेखक म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९३३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीकाठी वसलेल्या कोल्हार गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. कुटुंबाकडे असलेली अल्पशा शेती सावकारांकडे गेल्यामुळे लहानपणापासूनच संघर्षाचा अनुभव त्यांच्या वाट्याला आला.कोल्हार येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राहुरी येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले. पुढील उच्च शिक्षणासाठी ते कोल्हापूरला आले. कोल्हापूरमधील राजाराम कॉलेज आणि शहाजी लॉ कॉलेजमधून (Rajaram College and Shahaji Law College) त्यांनी शिक्षण पूर्ण केले. कोल्हापूर हीच त्यांची कर्मभूमी ठरली.
विद्यार्थीदशेत वृत्तपत्र विक्रेता (newspaper vendor) म्हणून काम करणाऱ्या पानसरे यांनी पुढे नगरपालिका शिपाई, शिक्षक अशी विविध कामे केली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. कामगार आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी वकिलीही केली.गोविंद पानसरे १९५२ पासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (Communist Party of India)सभासद होते. त्यांनी भाकपचे महाराष्ट्र राज्य सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली. १९५५ च्या गोवा मुक्ती आंदोलनात (Goa Liberation Movement) त्यांचा सक्रिय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते अग्रभागी होते. कोल्हापूर येथील संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते जिल्हा सचिव होते. कष्टकरी, शेतकरी, कामगार तसेच सामाजिक व सांस्कृतिक चळवळींना दिशा देणारे मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख होती.
पानसरे यांची हत्या कशी झाली?

१६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना कोल्हापूरमधील त्यांच्या निवासस्थानाजवळ दोन अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलीतून गोळीबार केला. या हल्ल्यात गोविंद पानसरे गंभीर जखमी झाले, तर त्यांची पत्नी उमाताई पानसरेही जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ८२ वर्षे होते.
या प्रकरणात विशेष तपास पथकाने (Special Investigation Team) डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना अटक केली होती. मात्र, तपासावर असमाधान व्यक्त करत पानसरे कुटुंबीयांनी हा तपास एटीएसकडे सोपवावा, अशी मागणी उच्च न्यायालयात केली. त्यानुसार २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हा तपास एटीएसकडे (Anti-Terrorism Squad) वर्ग केला.
९ जानेवारी २०२३ रोजी कोल्हापूर सत्र न्यायालयाने दहा संशयितांवर हत्या आणि कट रचल्याप्रकरणी आरोप निश्चित केले. यामध्ये समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे, सचिन आंदुरे, वासुदेव सूर्यवंशी, अमित डेगवेकर, गणेश मिस्कीन, अमित बद्दी, शरद कळसकर आणि भरत कुरणे यांचा समावेश आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
शिवाजी कोण होता? पुस्तकामुळे हत्या झाल्याचा दावा

कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता? (Who Was Shivaji) या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सोप्या, अभ्यासपूर्ण आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत मांडले. या पुस्तकाने विक्रीचे विक्रम प्रस्थापित केले असून हिंदी, इंग्रजी, कन्नडसह विविध भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले आहे.
या पुस्तकात पानसरे यांनी शिवाजी महाराजांना कष्टकरी, शेतकरी आणि सामान्य जनतेशी जोडणारे लोककल्याणकारी नेतृत्व म्हणून मांडले होते. शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे आतापर्यंत ३६ वेळा पुनर्मुद्रण झाले असून दीड लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. १० एप्रिल १९८८ रोजी या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. पण शिवाजी कोण होता? हे पुस्तक लिहिल्यामुळेच गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा त्यांच्या कुटंबीयांनी केला आहे.
हे देखील वाचा –
मुंबई महापालिकेत मनसेच्या गटनेतेपदी यशवंत किल्लेदारांची नियुक्ती
महापौराचे ‘अनुसूचित जमाती’चे आरक्षण झालेतर मुंबईत उबाठाचा महापौर! गुरुवारी निर्णय
वसईच्या खोल समुद्रात रहस्यमय गोलाकार रिंगण, मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण









