Guardian Minister Resigns – राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामागे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची नाराजी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मात्र मंत्री पाटील यांनी तब्येतीच्या कारणामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले . यानंतर गोंदियाच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे सोपवण्यात येईल अशी चर्चा आहे.
मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की,काही दिवसांपूर्वी गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी लांबचा प्रवास टाळायला सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यात वारंवार जाता येत नाही. यामुळेच पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला. प्रफुल्ल पटेल यांनी टीका केली म्हणून रागाने मी राजीनामा दिलेला नाही.
राग यायचे कारणच नाही. ते जे काही म्हणाले ते बरोबर आहे. पालकमंत्रिपदामुळे जिल्ह्याची थोडी गैरसोय होत होती. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे त्यामुळे सर्वच काही मनासारखे होणार नाही.
नागपूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातील पालकमंत्र्यांवर टीका केली होती.
पालकमंत्री फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे रोजी जिल्ह्यात दिसतात. त्यांच्या कार्यशैलीमुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये नाराजी आहे. या टिप्पणीनंतर काही दिवसांतच पाटील यांनी राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले.
हे देखील वाचा –
चंद्रकांत पाटलांचा सल्ला घ्यावा लागेल ! रवींद्र धंगेकरांचा टोला
वादानंतर ‘मनाचे श्लोक’ सिनेमाचं नावं बदलले! मृण्मयी देशपांडेचा चित्रपट आता ‘या’ तारखेला होणार