नवी दिल्ली – देशभर गाजत असलेल्या ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh), सुरेश रैना (Suresh Raina) आणि हरभजन सिंग (Harbhajan) यांची चौकशी केली. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेते सोनू सूद आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला (actor Urvashi Rautela.)यांचीही चौकशी करण्यात आली.
ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार वन बेट, फेअर प्ले आणि महादेव ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी असूनही त्यांचे प्रमोशन बॉलिवूड कलावंत आणि या क्रिकेटपटूंनी केले होते. यामागील आर्थिक व्यवहाराचा तपास ईडी करत आहे.
एप्रिल महिन्यातही महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली होती. त्यानंतर ईडीने या प्रकरणात विविध ठिकाणी छापे टाकून ५७३ कोटी रुपयांची मालमत्ता जपत केली. १६ एप्रिल २०२५ रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दिल्ली, मुंबई, इंदूर, अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई आणि संबलपूर (ओडिशा) येथील अनेक ठिकाणी छापे टाकले. एप्रिल २०२५ मध्ये, ईडीने महादेव अॅप प्रकरणात देशभरात मोठ्या प्रमाणावर छापे टाकले होते. ५७३ कोटी रुपयांची मालमत्ता गोठवण्यात आली, तर ३.२९कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.यासोबतच कोलकाता, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, आणि आसाम येथेही शोधमोहीम राबवण्यात आली. ईडीने ७६६ बँक खाती आणि १७ डेबिट/क्रेडिट कार्ड गोठवले. तसेच विशाल भारद्वाज उर्फ बादल भारद्वाज आणि सोनू कुमार ठाकूर यांना अटक केली.