Home / News / मराठवाड्यात तुफान पाऊस अनेक गावांमध्ये पाणी शिरले

मराठवाड्यात तुफान पाऊस अनेक गावांमध्ये पाणी शिरले

Marathwada Rain

लातूर- मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस ( heavy rain) सुरु असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. लातूरमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कर (Indian army) तैनात करण्यात आले असून शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आणि अहमदपूर तालुक्यात पुरात अडकलेल्या दहा जणांची स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आणि नागरिकांनी सुटका केली. खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराचे एक पथक अहमदपूर येथे दाखल झाले. शिरूर अनंतपाळ येथे नदीकाठावरील शेडमध्ये अडकलेल्या पाच व्यक्तींना स्थानिक पथकाने सुखरूप बाहेर काढले. अहमदपूर तालुक्यातील मौजे काळेगाव येथील साठवण तलावाच्या सांडव्यावर अडकलेल्या एका व्यक्तीची तातडीने सुटका करण्यात आली.

अनंतपाळ येथील घरणी नदीवरच्या पुलाच्या बांधकामावेळी पाण्यात अडकलेल्या ३ मजुरांना स्थानिक पथकांनी बाहेर काढले. तसेच, मौजे माकणी येथे गावाजवळील पुलावरून जाताना एक व्यक्ती पाण्यात वाहत गेली. दौलत गोपाळ डोंगरगावे असे त्यांचे नाव असून त्यांना स्थानिक गावकऱ्यांनी वाचवले. परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली आहे. त्रिधारा पाटी ते त्रिधारा मंदिर उखळद बाभळी येथे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत असल्याने कोणत्याही क्षणी कालव्यातून पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी गुरढोरांसह सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. झिरोफाटापूर्णा नांदेड मार्गावरील माटेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे.नांदेड जिल्ह्यात तब्बल ६९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कंधार महसूल मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. नांदेड तालुक्यातील सात महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. बिलोली, कंधार, लोहा तालुक्यातील प्रत्येकी ६, मुखेड ८, नायगाव, हदगाव तालुक्यात प्रत्येकी ५, भोकर, धर्माबाद, उमरी तालुक्यात प्रत्येकी ४, अर्धापूर, मुदखेड तालुक्यात प्रत्येकी ३ आणि किनवट आणि हिमायतनगर तालुक्यातील एका महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

नांदेड हैद्राबाद देगलूर उदगीर नरसी बिलोली रस्ते बंद पडले होते. देगलूर, नायगाव, मुखेड तालुक्यातील ३ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. विष्णूपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. १ लाख २९ हजार ७४३ क्युसेस वेगाने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. जवळा पांचाळ गावातल्या भेंडी नदीला पूर आल्याने घरात, दुकानात पाणी शिरले. वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी तालुक्यात रात्रीपासून पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्याने आज वसमत, औंढा तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून सूर्यदर्शन झालेले नाही. पावसाने जिल्ह्यातील अंबाजोगाई व शिरूर कासार या दोन तालुक्यासह जिल्ह्यातील बीड, पाटोदा, आष्टी, अंबाजोगाई, केज, किल्ले धारूर, शिरूर कासार या सात तालुक्यामधील १६ महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. धाराशिव शहर आणि परिसरात आज सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. पावसाचा जोर कमी जास्त होत आहे. रात्रभर संततधार सुरूच होती. आज सूर्यदर्शनही झालेले नाही. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा-

उत्तर प्रदेशात हुंड्यासाठी अ‍ॅसिड प्यायला लावले! पीडितेचा मृत्यू

मराठवाड्यात पूरस्थितीमुळे जनजीवनविस्कळीत! अनेक गावांचा संपर्क तुटला