उद्धव ठाकरेंसोबत राहणार ! तेजस्वी घोसाळकरांचे वक्तव्य

Tejasvee Ghosalkar & Abhishek Ghosalkar

मुंबई – भाजपाची सत्ता असलेल्या मुंबई बँकेच्या संचालकपदी उबाठाच्या (UBT) माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर (Tejasvi Ghosalkar)यांच्या नियुक्तीमुळे त्यांचा लवकरच भाजपा प्रवेश होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आज त्यांनी असे म्हटले की, मला कोणत्याही पक्षाने ऑफर दिलेली नाही. मी उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray)राहणार आहे. मुंबई बँक संचालकपदासाठी मी १ वर्षांपासून आग्रही होते. याबाबत उद्धव ठाकरे यांना मी माहिती दिली होती. याबाबत एकमताने निर्णय घेण्यास वेळ लागला. पण यै नियुक्तीकडे राजकीय नजरेने पाहू नये.

तेजस्वी यांचे पती अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar)२०१२ ते २०१७ दरम्यान मुंबई महापालिकेचे नगरसेवक होते. याच कालावधीत त्यांनी मुंबई बँकेचे (Mumbai District Central Co-operative bank)संचालकपदही भूषवले होते. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांची हत्या झाल्यानंतर संचालकपदाची जागा रिक्त होती. तेजस्वी यांनी काही दिवासांपूर्वीच उबाठा पक्षाच्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. उबाठा नेते विनोद घोसाळकर यांनी पक्ष सोडावा म्हणून तेजस्वी यांच्यावर शिंदे गट आणि भाजपा (BJP)दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर काल त्यांना हे पद देण्यात आल्याने उबाठा सोडण्यासाठी त्यांना आमिष दाखवण्यात आले, अशी चर्चा सुरू झाली.

तेजस्वी घोसाळकर यांना आज आपल्या इंस्टग्राम (instagram)पोस्टमध्ये म्हटले की, माझे पती अभिषेक घोसाळकर यांच्या रिक्त असलेल्या बँकेच्या संचालक पदावर माझी निवड झाली. मी बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर आणि सर्व संचालक मंडळाचे आभार मानते. काम करणे हाच खरा सहकार धर्म आहे. त्यामुळे या निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहू नये. हे अत्यंत चुकीचे ठरेल. हा माझा सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचा व पहिलाच अध्याय आहे. मी नक्कीच चांगले काम करेल याची खात्री देते.