Imran Khan Supporters Riot- Sister Allowed Visit – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येच्या अफवेच्या पार्श्वभूमीवर आज त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले. सर्व दिशांनी हजारोंच्या संख्येने समर्थक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अदियाला कारागृहाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला.
यावेळी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी इम्रान समर्थकांचे आंदोलन दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अखेर समर्थकांच्या रेट्यापुढे नमते घेत कारागृह प्रशासनाने बहिणींना इम्रान खान यांची भेट घेऊ दिली.
इम्रान खान यांच्या भगिनी डॉ. उज्मा खानुम भेटीनंतर म्हणाल्या की, तो ठीक आहे. पण मानसिक छळ होत असल्यामुळे तो संतापला होता. तो दिवसभर फक्त त्याच्या कोठडीत असतो. केवळ थोड्या काळासाठी बाहेर पडू शकतो. त्याला कोणाशीही संवाद साधू दिला जात नाही.
इम्रान खान यांची कारागृहात हत्या करण्यात आल्याचे वृत्त तीन दिवसांपूर्वी पसरले. तेव्हापासून इम्रान समर्थक आणि त्यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. इम्रान खान यांच्या बहिणींदेखील शनिवारी अदियाला कारागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते.
इम्रान खान यांची भेट घेऊ द्या, अशी मागणी त्यांनी केली होती. दुसरीकडे पीटीआयचे कार्यकर्ते ठिकठिकाणी निदर्शने करत होते. अखेर कारागृह प्रशासनाने इम्रान खान यांची भेट घालून देऊ, असे आश्वासन त्यांच्या बहिणींना दिल्यानंतर त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले होते.
मात्र आश्वासन देऊनही कारागृह प्रशासनाने इम्रान खान यांची भेट घालून दिली नाही. त्यामुळे पीटीआयच्या वतीने आज अदियाला कारागृहावर चाल करून जाण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले. त्यानुसार सकाळपासून पीटीआयचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने चहूबाजूंनी रावळपिंडीकडे निघाले.
मात्र पोलिसांनी वाटेत सर्वत्र बॅरिकेड उभारून कार्यकर्त्यांना रोखून धरले. इम्रान समर्थकांचा रोष पाहून प्रशासनाने दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश दिले. रावळपिंडी शहरात उद्या 3 डिसेंबरपर्यंत कर्फ्यू लागू राहणार आहे. कर्फ्यू लागू करण्याचे आदेश देताच सरकारने पोलिसांसोबत सैनिकांना मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरवले.
दुसरीकडे इस्लामाबादमध्ये उच्च न्यायालयाच्या आवारात इम्रान समर्थकांनी जोरदार निदर्शने केली. इम्रान खान यांना तुरुंगातून मुक्त करा, अशा घोषणा देत त्यांनी न्यायालयाचा परिसर दणाणून सोडला. इमरान खान ऑगस्ट 2023 पासून आदियाला कारागृहात बंद आहेत. गेल्या सुमारे महिन्याभरापासून कोणलाही त्यांची भेट घेऊ दिली जात नाही.
त्यामुळे त्यांची कारागृहात हत्या करण्यात आली असावी, अशी अफवा उठली. कारागृह प्रशासनाने इम्रान खान यांची प्रकृती ठणठणीत आहे, असे निवेदन केले. मात्र त्यांची भेट घेऊ दिली नाही.
दरम्यान, इम्रान खान यांच्या घटस्फोटीत पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की, इम्रानच्या मुलांना आपल्या वडिलांशी फोनवरून संवाद साधण्यासही कारागृह प्रशासनाने मनाई केली आहे.
हे देखील वाचा –
महात्मा फुलेंचा वाडा भुजबळांच्या समता परिषदेला देण्याचा प्रयत्न ! संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध









