Home / News / ISRO Launches US Satellite : इस्रोची देदीप्यमान कामगिरी अमेरिकेचा उपग्रह भारताने सोडला

ISRO Launches US Satellite : इस्रोची देदीप्यमान कामगिरी अमेरिकेचा उपग्रह भारताने सोडला

ISRO Launches US Satellite – भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज आणखी एक देदीप्यमान कामगिरी केली. आज सकाळी 8 वाजून...

By: Team Navakal
ISRO Launches US Satellite
Social + WhatsApp CTA

ISRO Launches US Satellite – भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज आणखी एक देदीप्यमान कामगिरी केली. आज सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अवकाश तळावरून इस्रोने अमेरिकेच्या 6 हजार 100 किलो वजनाच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 या उपग्रहाचे पृथ्वीच्या निम्न कक्षेत (लोअर अर्थ ऑर्बिट) यशस्वी प्रक्षेपण केले.

भारतातून प्रक्षेपित करण्यात आलेला हा सर्वाधिक वजनाचा उपग्रह ठरला. एलव्हीएम 3-एम 6 या 640 टन वजनाच्या अग्निबाणाच्या सहाय्याने हे उपग्रह प्रक्षेपण करण्यात आले. याच एलव्हीएम 3 अग्निबाणाच्या सहाय्याने सन 2023 मध्ये चांद्रयान-3 या मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रवावर अंतराळ यान उतरवून इस्रोने इतिहास घडवला होता. या अग्निबाणाच्या अगडबंब वजनामुळे (640 टन) मीडियाने बॉलिवूडमधील सुपरहीट चित्रपट बाहुबलीवरून प्रेरणा घेऊन बाहुबली रॉकेट असे नाव दिले आहे.


ब्लूबर्ड ब्लॉक-2 हा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपग्रह आहे. सामान्य स्मार्टफोनला वेगवान ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून देणे हा या उपग्रहाचा उद्देश आहे. या उपग्रहामुळे पृथ्वीवर कुठेही मोबाईल टॉवरशिवाय 4जी, 5जी व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल, मेसेजिंगसारख्या सर्व सेवा उपलब्ध होणार आहेत. हा एक व्यावसायिक उपक्रम आहे.इस्रोशी संलग्न असलेल्या न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि अमेरिकेच्या एएसटी स्पेस मोबाईल या कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.


पृथ्वीच्या निम्न कक्षेत स्थापन झाल्यानंतर ब्लूबर्ड ब्लॉक-2 उपग्रहाचा प्रचंड मोठा एंटेना उघडला गेला. या एंटेनाच्या साह्याने मोबाईल सिग्नल पृथ्वीवरील केंद्राकडे वेगाने पाठवले जातील. पृथ्वीवरील केंद्राकडून मग हे सिग्नल प्रत्यक्ष मोबाईल फोनपर्यंत पोहोचवले जातील. या उपग्रहामुळे टॉवरशिवाय एसएमएस आणि इंटरनेट सेवा पुरवणे येत्या काळात शक्य होणार आहे.

दुर्गम पर्वत, निबिड जंगल, वाळवंटी प्रदेश आणि समुद्रातही या उपग्रहाद्वारे मोबाईल आणि इंटरनेट सेवा पुरवली जाणार आहे. पृथ्वीवरील कसल्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा प्रतिकूल परिणाम या उपग्रहाच्या सेवेवर होणार नाही. साहजिकच ग्रामीण भाग आणि दर्गम भागांपर्यंत मोबाईल आणि इंटरनेट सेवा विनाअडथळा पोहोचवता येणार आहे.

दीड मिनिटांचा विलंब


इस्रोने दिलेल्या माहितीनुसार आजचे हे उपग्रह प्रक्षेपण 90 सेकंद विलंबाने झाले. सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी प्रक्षेपण व्हायचे होते. मात्र त्यावेळी श्रीहरिकोटाच्या अंतराळ क्षेत्रातून हजारो सक्रीय उपग्रह मार्गक्रमण करत होते.त्यांच्याशी धडक होण्याची शक्यता असल्याने प्रक्षेपण दीड मिनिटे उशिराने करण्याचा निर्णय ऐनवेळी घेण्यात आला.

अखेर 8 वाजून 55 मिनिटे 30 सेकंदांनी 43.5 मीटर उंचीचा एव्हीएम 3-एम6 अग्निबाण ब्लूबर्ड ब्लॉक-2 उपग्रहाला घेऊन अवकाशात झेपावला. प्रक्षेपणानंतर पंधरा मिनिटांच्या प्रवासानंतर ब्लूबर्ड उपग्रह अग्निबाणापासून वेगळा झाला आणि पृथ्वीपासून 520 किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या निम्न कक्षेत यशस्वीपणे स्थापित करण्यात आला.


हे देखील वाचा – 

पाकिस्तानी एअरलाइन्सची ४८२ दशलक्ष डॉलरमध्ये विक्री

Sudhir Mungantiwar : ‘मंत्रिपद नाही म्हणून हरलो असं नसतं’; मुनगंटीवारांच्या घरच्या आहेरावर बावनकुळेंचे थेट उत्तर

15 वर्षांनंतर कोहली तर 7 वर्षांनंतर रोहित विजय हजारे ट्रॉफीत खेळणार; पाहा कधी मैदानावर उतरणार?

Web Title:
संबंधित बातम्या