Ladakh Statehood Demand Turns Violent – केंद्रशासित प्रदेश असा दर्जा असलेल्या लडाखला पूर्ण राज्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) व्हॅनला आग लावली.
तर काही आंदोलकांनी भाजपा कार्यालय पेटवून दिले. या मागणीवरून पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक(Sonam Wangchuk) मागील पंधरा दिवसांपासून उपोषण करत आहेत.
वांगचूक यांनी छेडलेल्या उपोषणाला समर्थन म्हणून आज हे विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले. केंद्र सरकार पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य करत नसल्याच्या निषेधार्थ आज लडाख बंदची हाक देण्यात आली होती.
आंदोलनादरम्यान काही ठिकाणी विद्यार्थ्यांची सीआरपीएफच्या जवानांशी झटापटही झाली.लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, राज्याला घटनेतील सहाव्या अनुच्छेदानुसार घटनात्मक संरक्षण द्यावे, कारगिल आणि लेह हे लोकसभेचे मतदारसंघ बनवावेत आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे, या चार प्रमुख मागण्या आंदोलक करत आहेत.
केंद्र सरकारने २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू असलेले कलम ३७० आणि कलम ३५-अ रद्द करून राज्याचे विभाजन करत जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. त्यावेळी येथील परिस्थिती सामान्य झाल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशांना पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारने हे आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही.
विद्यार्थ्यांनी केलेल्या या हिंसक आंदोलनामुळे वांगचूक कमालीचे संतापले. त्यांनी थेट उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. ते आपल्या संदेशात म्हणाले की, आजचा दिवस लडाखसाठी दुःखद दिवस आहे.
आम्ही पाच वर्षांपासून या मागणीसाठी शांततेचा मार्ग अनुसरला. उपोषणे केली, लेह ते दिल्ली चालत गेलो. पण आज आमचा शांतीचा संदेश असफल झाला. हिंसा,गोळीबार झाला. आगी लावल्या गेल्या. मी लडाखच्या युवा पिढीला आवाहन करतो की, त्यांनी हा मूर्खपणा बंद करावा. मी माझे उपोषण मागे घेत आहे. आंदोलन थाबवत आहे.
हे देखील वाचा –
आयोगाच्या आधार लिंक सुविधेवर राहुल गांधींची टीकात्मक पोस्ट
मुंबईतील प्रवासाचा ताण कमी होणार; लवकरच सुरु होणार
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस