Home / News / Marathwada Farmers Devastated : मराठवाड्याचे शेतकरी उद्ध्वस्त झाले ! पीक गेले! माती गेली! पुन्हा पावसाचा इशारा

Marathwada Farmers Devastated : मराठवाड्याचे शेतकरी उद्ध्वस्त झाले ! पीक गेले! माती गेली! पुन्हा पावसाचा इशारा

Marathwada Farmers Devastated – सलग दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याला अस्मानी संकटात (natural calamity)ढकलले आहे. या पावसामुळे अनेक...

By: Team Navakal
Marathwada Farmers Devastated

Marathwada Farmers Devastated – सलग दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याला अस्मानी संकटात (natural calamity)ढकलले आहे. या पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेष करून दक्षिण महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यात (South Maharashtra, Khandesh, and Marathwada,)पिके नष्ट झाली आहेत. पुराच्या पाण्यामुळे 4 ते 5 फूट पर्यंत माती वाहून शेती अक्षरशः खरवडून गेली. त्यामुळे पुढची काही वर्षे पीक घेता येणार नाही अशी स्थिती आहे. त्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

70 लाख एकर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.(7 million acres of farmland) रस्ते-पूल वाहून गेले आहेत. (Roads and bridges have been washed away)जनजीवन विस्कळीत झाले. घरातही पाणी शिरले. अनेक गावांचा संपर्क तुटला. या पुरामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला तर 150 पेक्षा अधिक जनावरे दगावली आहेत. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी होत आहे. संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज धाराशीव येथे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांचा ताफा अडवला.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांचा दौरा करण्याच्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देत राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेऊन तातडीने मदतीचे आश्वासन दिले आहे.

दक्षिण महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी आणि माजलगाव धरण भरल्याने सतत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पाऊस थांबला असला तरी गोदावरीच्या काठावरील गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरात मुसळधार पावसामुळे कापूस व सोयाबीन पिके वाहून गेली आहेत.

बीडचे शेतकरी धर्मराज सुरवसे यांचे सगळे शेत पाण्याखाली गेले, आता पुढचे पीक घेण्यासारखीही परिस्थिती नाही, अशी वेदना व्यक्त केली. बीडच्या ग्रामीण भागात रस्ते, वस्ती, विजेचे खांब आणि शेतातील बांधही पावसामुळे कोसळले आहेत. 

शिरसमार्ग गावातील सिंदफणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. तर माजलगाव तालुक्यात सांडस चिंचोली गावात पुरात अडकलेल्या गर्भवतीला एनडीआरएफने वाचवले. परभणीच्या सेलू तालुक्यात घरात पाणी शिरले. पाटोदा येथे आ. सुरेश धस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांशी पाहणी करत संवाद साधला.

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूम तालुक्यातील पाचही महसूल मंडळांत शेती व जनावरांचे मोठे नुकसान झाले. पिंपळगाव बेलगाव येथे 17 गायी मृत्युमुखी पडल्या, तर 10 गायी, 15 वासरे आणि 20 शेळ्या पुरात वाहून गेल्या. धाराशीव शहरात 132 मिमी पावसाची नोंद झाली. अनेक भागांत पाणी घरात आणि दुकानांमध्ये घुसले. अंतरगाव येथे बाणगंगा नदीला पूर आल्याने 400 हेक्टर शेतीत नुकसान झाले. 50 हेक्टर जमीन खरवडली आहे.

विविध गावांतील एकूण 105 घरांचे नुकसान झाले. याठिकाणी 87 जनावरे दगावल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे. धाराशिवमध्ये देवनाबाई वारे नावाच्या 70 वर्षांच्या महिलेचा झोपेत बुडून मृत्यू झाला. ती तिच्या पत्र्याच्या छताच्या शेडमध्ये झोपली होती तेव्हा पुराचे पाणी तिच्या घरात शिरले. 

धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना संतप्त शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. चिंचपूर ढगे (भूम तालुका) येथे शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवून तत्काळ मदतीची मागणी केली. शेतकऱ्यांची जनावरे दगावल्यामुळे ते भावनिक झाले. काहींना रडूही कोसळले. गिरीश महाजन यांनी मी पैसे घेऊन आलो नाही. प्रशासनाला सांगतो एवढेच उत्तर दिले. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून महाजनांनी पुढील गावातील पाहणी रद्द करून बार्शीकडे रवाना झाले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मस्की गावात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मका पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांपुढे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. जिल्ह्यातील टाकळी येथे दूध घेऊन जाताना साहेबराव दहिहंडे (57)या शेतकऱ्याचा पाण्यात पडून मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. 

उजनी व सीना-कोळेगाव प्रकल्पांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने भीमा व सीना नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक गावे पाण्याखाली असून, शेकडो नागरिक अडकले आहेत. दारफळ येथे बचावपथकाने या भागात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने एअरलिफ्ट केले. 

बार्शीत पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. सीना नदीत 2 लाख क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले. खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील शाळांना सुट्टी जाहीर केली होती. करमाळा येथील संगोबा मंदिरात 90 नागरिक अडकले होते. या बचावकार्यावेळी बचाव पथकाची बोट बंद पडल्याने अडचण निर्माण झाली होती.

जालना जिल्ह्यात अंबड येथे ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर ढोल ताशे वाजवत, हातात असूड घेऊन बोंबा मारो आंदोलन केले. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीचीही मागणी केली. नाशिक जिल्ह्यात गंगापूरसह 14 धरणांतून विसर्ग सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातील रंगवली नदीचा जलपातळी वाढला असून, शेतीपिके पाण्याखाली गेली आहेत.

पेठ तालुक्यात पेठ, कोहोर परिसरात नदी-नाल्यांना पूर आल्याने मोठे नुकसान झाले. धुळे जिल्ह्यात हरभरा, मका, कापूस यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. जळगावमध्ये पुरामुळे रुग्णालयात पाणी घुसल्याने एक तरुण नाल्यात वाहून गेला. अहिल्यानगर जिल्ह्यात सूर्यकांता नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली.

पूरपरिस्थितीवर बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई दिली जाणार आहे. यामध्ये पशुधन नुकसानग्रस्तांचाही समावेश असणार आहे. राज्यात जवळपास 70 लाख एकर शेतीचे नुकसान झाले. यामध्ये नांदेड, सोलापूर, यवतमाळ, धाराशिव, बीड, अहिल्या नगरसह 30 जिल्ह्यांत मोठा फटका बसला आहे. 

नदीकाठच्या जमिनीवरील माती वाहून गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नुकसान पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. कर्जमाफीसंदर्भातही योग्य वेळी निर्णय घेतला जाईल आणि जनावरे गमावणाऱ्या शेतकऱ्यांना मदत केली जाईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 102 टक्के जास्त म्हणजेच 975 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पूरग्रस्त भागांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मी स्वतःदेखील काही जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. राज्य सरकारने आतापर्यंत 2 हजार 215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत एकाच वेळी नाही तर विविध शासन निर्णयांद्वारे टप्प्याटप्प्याने वितरित केली जाणार आहे. राज्यातील सुमारे 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

राज्य सरकार स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून देत आहे. केंद्राची मदत नक्कीच घेऊ, पण त्यासाठी वाट पाहत बसणार नाही. शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. मला राजकारण करायचे नाही, पण काही पक्ष प्रत्येक गोष्टीत राजकारण करतात. पूरग्रस्त भागात रेड कार्पेट टाकून पाहणी केल्याची घटना लोकांना अजूनही लक्षात आहे.

जुलै-ऑगस्टमधील पूरग्रस्तांना

प्रति कुटुंब केवळ 8, 800 रुपये

मुंबई – गेल्या दोन महिन्यांत पावसामुळे झालेली नुकसान भरपाई शेतक-यांना मिळत नसल्याबद्दल विरोधी पक्षांनी राज्य सरकारला धारेवर धरल्यानंतर अखेर राज्य सरकारने शेतक-यांना व अन्य आपद्ग्रस्तांना 1 हजार 339 कोटींचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय मंगळवारी जारी केला.

15 लाखांहून अधिक शेतकर्यांना मदतीचा हा आकडा असल्याने प्रत्येक शेतकरी कुटुंबाला सरासरी केवळ 8 हजार 800 रूपयांची मदत मिळाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही मदत तुटपुंजी असल्याची संतप्त भावना शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांत सध्या अतिवृष्टीने थैमान मांडले असताना व शेतकर्यांना काय मदत द्यायची याबद्दल राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू असताना जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासकीय मदतीचा निर्णय महसूल व वन विभागाच्यावतीने जारी करण्यात आला.

राज्यात जून ते ऑगस्ट या काळात झालेल्या अतिवृष्टी व पूर याचा फटका राज्यातील 19 लाख 22 हजार 909 शेतक-यांच्या 15 लाख 45 हजार 250 हेक्टर शेती व शेतीपिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी 1 हजार 339 कोटी 49 लक्ष 25 हजार इतके अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. थेट शेतक-यांच्या खात्यात ही मदत लवकरात लवकर जमा केली जावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले .


हे देखील वाचा 

क्रिकेटप्रमाणे पाकिस्तानच्या फुटबॉलपटूचे सेलिब्रेशनही वादात

पोलिसांनी अडवली फ्रेंच राष्ट्राध्यक्षांची गाडी, मॅक्रॉन यांनी थेट ट्रम्प यांना लावला फोन; व्हिडिओ व्हायरल

भारतातील सत्ता बदलण्याचा चीनचा डाव? तिबेटच्या नेत्याने केला ‘हा’ मोठा दावा

Web Title:
संबंधित बातम्या