Mehul Choksi’s Plea Rejected – पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला मोठा झटका बसला आहे. त्याच्या प्रत्यार्पणाच्या विरोधात त्याने केलेली याचिका बेल्जियमच्या उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
बेल्जियमच्या न्यायालयाने आधीच चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली होती. मात्र या निर्णयाविरुद्ध चोक्सीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ती आता फेटाळण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारताच्या तपास यंत्रणांना मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.
भारत सरकारने गेल्या काही वर्षांपासून चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याला भारतात आणल्यानंतर कारावासात ठेवण्याची आणि वैद्यकीय तसेच मानवी हक्कांशी सुसंगत सुविधा देण्याची हमी भारत सरकारने बेल्जियमला दिली.
चोक्सीला आता या निर्णयाविरुद्ध बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याचा पर्याय आहे, मात्र त्यात दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
१३,००० कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात मेहुल चोक्सी हा मुख्य आरोपी असून, २०१८ मध्ये तो भारतातून फरार झाला होता. सीबीआय आणि ईडीने त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचे अनेक गुन्हे दाखल केले आहेत. ११ एप्रिल २०२५ रोजी बेल्जियम पोलिसांनी त्याला अटक केली होती आणि तो तेव्हापासून तेथील तुरुंगात आहे.
हे देखील वाचा –
आयुष – अॅलोपॅथी डॉक्टर समानता वरिष्ठ खंडपीठाकडे निर्णय वर्ग
राष्ट्रवादीतून ऑफर होती पण पक्षनिष्ठा ठेवली आणि भले झाले ! मोहोळांच्या विधानाने चर्चा