Modi to Unfurl Dharma Dhwaj – प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्या उद्या आणखी एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिराच्या १९१ फूट उंच मुख्य शिखरावर विशेष केशरी ‘धर्म ध्वज’ फडकवणार आहेत. अहमदाबादच्या शिल्पकारांनी हा ध्वज तयार केला आहे. यासाठी अयोध्या नगरीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सुमारे १५ किलोमीटरचा रोड शो काढत पंतप्रधान मोदी हे राम मंदिरात पोहोचतील. हा संपूर्ण मार्ग आठ भागांमध्ये विभागला गेला आहे. प्रत्येक झोनमध्ये विविध महिला स्वयं-सहायता गट पारंपरिक थाळी, आरती आणि नमस्काराच्या मुद्रेत पंतप्रधानांचे स्वागत करतील. सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे १५ किलोमीटरच्या परिसरात एटीएस आणि निमलष्करी दलही तैनात करण्यात आले आहेत.
पंतप्रधानांच्या स्वागतासाठी वैदिक मंत्रोच्चार, शंखनाद आणि घंटानाद करण्यात येणार आहे. तसेच मार्गावर संस्कृत महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वस्तिवाचन करतील आणि उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध लोक नृत्ये (मयूर नृत्य, राई नृत्य) सादर केली जातील. हा सोहळा जनतेला पाहता यावा यासाठी शहरभर ५० हून अधिक एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत.
मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, हे ध्वजारोहण म्हणजे श्रीराम आता त्यांच्या खऱ्या जागेवर विराजमान आहेत याची जागतिक घोषणा आहे.
शिखराची प्रतिष्ठापना
अद्याप झालेली नाही
ध्वजारोहणासाठी शंकराचार्यांना बोलावण्यात आले नाही. ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी ध्वजारोहणावर आक्षेप घेतला आहे. ध्वजारोहणाबद्दल शास्त्रात उल्लेख नसून शिखराची प्रतिष्ठापना झालेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे या सोहळ्यासाठी राम मंदिर निर्माण कार्यात २ कोटी रुपयांहून अधिक देणगी देणाऱ्या १०० दात्यांना आणि आसपासच्या २५ जिल्ह्यांतील प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.









