Home / News / Municipal Council & Panchayat Elections on Dec 2 : नगर परिषद, पंचायत निवडणुका 2 डिसेंबरला सर्व मागण्या धुडकावल्या! विरोधक संतापले

Municipal Council & Panchayat Elections on Dec 2 : नगर परिषद, पंचायत निवडणुका 2 डिसेंबरला सर्व मागण्या धुडकावल्या! विरोधक संतापले

Municipal Council & Panchayat Elections on Dec 2 – राज्यात अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले...

By: Team Navakal
Municipal Council & Panchayat Elections on Dec 2
Social + WhatsApp CTA


Municipal Council & Panchayat Elections on Dec 2 – राज्यात अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली.

2 डिसेंबरला या निवडणुका होणार असून, त्यांचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. या घोषणेसोबत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025पर्यंतची मतदार यादी अंतिम मानली जाईल, असेही स्पष्ट केले. तसेच दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार नसून ती चिन्हांकित करून या मतदारांना दुसर्‍यांदा मतदार करण्यापासून रोखले जाईल, अशी माहिती दिली. या निवडणुकांत व्हीव्हीपॅटचाही वापर होणार नाही.

निवडणूक आयोगाने ही घोषणा करून मतदार यादीतील घोळासह अनेक आरोप करणार्‍या विरोधकांचे सर्व आक्षेप आणि मागण्या धुडकावून लावल्या. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी, आयोगाने सत्ताधार्‍यांच्या दबावाखाली अत्यंत घाईने निवडणुकांची घोषणा केल्याचा आरोप केला.


राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की, सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार राज्य निवडणूक आयोगामार्फत राज्यातील 246 नगर परिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. यातून 6859 सदस्य व 288 अध्यक्ष यांची निवड होणार आहे. 246 नगरपरिषदांमध्ये 236 नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपली आहे. तर 10 नवनिर्मित नगरपरिषदा आहेत. राज्यात 147 नगरपंचायती आहेत.

यातील 27 नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच संपली आहे. तर 15 नवनिर्मित पंचायती आहेत. उर्वरित 105 नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच समाप्त झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या निवडणुका होणार नाहीत. नगरपरिषदेच्या सदस्यांची संख्या सामान्यतः प्रत्येकी 20 ते 75 अशी आहे. तर नगरपंचायतीची सदस्यसंख्या 17 आहे.

नगरपरिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीनुसार होणार आहे. यात एका प्रभागात सर्वसाधारणपणे 2 जागा असतात. नगरपरिषदेचा सदस्यसंख्येचा आकडा विषम असेल तर तिथे एका ठिकाणी 3 जागा असतात. म्हणजे साधारणतः मतदारांना 2-3 सदस्यांसाठी
मतदान करावे लागेल.


नगरपंचायतीत 1 सदस्य व 1 अध्यक्ष अशी मतदारांना दोन मते द्यावी लागतील. नामनिर्देशन हे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने केले जाईल. आयोगाने यासंबंधी एक पोर्टल तयार करण्यात आले आहे. उमेदवारांना त्यावर आपले अर्ज भरावे लागतील. एका प्रभागात एका उमेदवाराला जास्तीत जास्त 4 उमेदवारी अर्ज भरता येतील.

संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट संबंधित निवडणूक अधिकार्‍याकडे जाऊन जमा करावी लागेल. उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. पण ज्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना अर्ज केल्याची पावती सादर करून आपला अर्ज भरता येईल. हा उमेदवार निवडून आल्यास त्याला सहा महिन्यांत आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल.


राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. ती 1 जुलैपर्यंतची आहे. त्यानुसार या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. विरोधकांच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी अशी मागणी केली होती की, निवडणूक जाहीर नसल्याने 31 ऑक्टोबरपर्यंतची मतदार यादी अंतिम मागणी केली होती.

त्यानंतर आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तसा प्रस्ताव पाठवला. परंतु त्यावर उत्तर आलेले नाही. ते आल्यास आम्ही त्याचा विचार करू. आम्ही मतदार यादी बनवत नाही. ती केंद्रिय निवडणूक आयोगाकडून घेतो. त्यातील दुबार-तिबार मतदार तपासतो. चुकीच्या नोंदी बघतो.

पण त्याची जबाबदारी आमची नसते. अंतिम मतदारयादी 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. सध्याच्या मतदार यादीनुसार एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यामध्ये 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार असतील. या निवडणुकांसाठी राज्यात एकूण 13 हजार 626 कंट्रोल युनिट आणि 57,452 बॅलट युनिट असतील. मात्र, या निवडणुकांत व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही. तशी आपल्या अधिनियमात संबंधित समितीने तरतूदच केलेली नाही.


गेल्या काही दिवसांत विरोधकांनी निवडणूक आयोगाला दुबार मतदारांवरून लक्ष्य केले आहे. दुबार मतदारांचे अनेक पुरावेही दिले आहेत. याबाबत बोलताना दिनेश वाघमारे म्हणाले की, दुबार मतदारांची समस्या सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाने एक टूल तयार केले आहे. मतदारयादीत ज्या मतदारांची नावे दुबार आहेत, त्या ठिकाणी दोन तार्‍यांची (स्टार्स)ची खूण असेल.

या मतदारांशी संपर्क साधला जाईल. या मतदाराला त्याला कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे हे विचारले जाईल. त्यानंतर त्यांनी पसंती दर्शवलेल्या मतदान केंद्रांवरच त्यांना मतदान करता येईल. त्याला इतर कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान करू दिले जाणार नाही. आम्ही संपर्क साधल्यावर प्रतिसाद दिला नाही, तर अशा मतदाराला मतदान केंद्रावर आल्यावर तिथला निवडणूक अधिकारी त्याची छाननी करेल. त्याच्याकडून मी दुसर्‍या कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करणार नाही किंवा केले नाही असे प्रतिज्ञापत्र घेतले जाईल.


निवडणूक आयोगाने आज निवडणुका जाहीर केल्याने विरोधक चांगलेच संतप्त झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली की, आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100 टक्के खात्री पटली की, निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधार्‍यांच्या हातचं बाहुलं आहे…

दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदाचं करायचं काय?


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत आयोगाच्या भेटीला मविआ-मनसे शिष्टमंडळ गेले असतानाच राज्य आयोगाने ही पत्रकार परिषद का घेतली, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, हा प्रश्न केवळ राजकीय पक्षांपुरता नाही, तर देशातील नागरिकांसमोरही निर्माण झाला आहे. लोकशाहीला दिलेले हे आव्हान आहे. निकोप वातावरणात निवडणुकीसाठी लोकांनीही आवाज उठवण्याची वेळ आली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, सत्ताधारी पक्षासोबत मिळूनच आयोगाचे काम सुरू आहे, असे आम्ही आधीपासूनच सांगत आहोत. हीच बाब यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे. सत्ताधारी पक्षांनाही मतदार याद्यांतले दोष मान्य आहेत. मग अशा याद्यांवर निवडणुकाच कशाला घेतात? निवडणूक घेण्याऐवजी थेट नियुक्त्याच द्याव्यात. लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होत आहे. आता जनतेनेच हा कट उधळून टाकावा.


उबाठाचे अनिल परब म्हणाले की, निवडणूक आयोग म्हणते की, दुबार मतदारांच्या नावावर स्टार करणार. म्हणजे काय, त्या माणसाला विचारणार? आता ही माणसे यांना सापडणार कशी? याची प्रोसेस काय? याला कशा पद्धतीने रोखणार? याचे काहीच उत्तर नाही. निवडणूक आयोग आपले मालक भाजपाचाच अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील.

निवडणूक कार्यक्रम


नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी सुरू होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असेल. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल. अपील असलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर असेल.

तर अपील नसलेल्या ठिकाणी ती 25 नोव्हेंबर असेल. 26 नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल आणि निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होईल. दुसर्‍या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. शासन राजपत्रात निकाल घोषित करण्याचा दिवस 10 डिसेंबर असेल.


हे देखील वाचा – 

Raj Thackeray : “निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं!” नगरपरिषद निवडणूक घोषणेनंतर राज ठाकरेंचा संताप, आयोगावर गंभीर आरोप

Web Title:
संबंधित बातम्या