मुंबई- सफाई कामगारांनंतर आता मुंबई महापालिकेच्या (BMC) पाणी खात्यातील (water department) कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.वरळीतील अभियांत्रिकी संकुलात संतप्त कामगारांनी नुकतीच निदर्शने करत विविध मागण्या केल्या. आपल्या मागण्यांची अंमलबजावणी ३१ ऑक्टोबरपर्यंत (31 st august) झाली नाही तर १ नोव्हेंबर (1st november) रोजी पाणी खात्यातील सर्व कामगार संपावर जातील, असा इशारा द म्युनिसिपल युनियनने दिला.
सफाई आणि परिवहन खात्यातील कंत्राटीकरण विरोधात स्वच्छता कामगारांनी दिलेल्या यशस्वी लढ्यानंतर आता पाणी खात्यातील कामगारही विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. पाणी खात्यातील कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. खात्यातील अनेक पदे रिक्त असल्याने कामगारांवर कामाचा ताण येत आहे. अनेकांना पदोन्नती मिळालेली नाही.त्यामुळे विविध संवर्गाची रिक्त व पदोन्नतीची पदे तातडीने भरावीत, पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा फायदा देणे, सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देणे, कामगारांना घाणकाम भत्ता द्यावा, मानीव कायमत्व व गोपनीय अहवालाची प्रत देणे ,प्रतवारी कामगारांना देणे, समान कामाला समान वेतन द्यावे, कामगारांना कर्तव्यसूची देणे, अतिकालीन भत्याचे योग्य पद्धतीने अधिदान करावे, चौकीवरून कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी वाहन उपलब्ध करावे तसेच चौक्यांची पुर्नबांधणी करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचीही मागणी या कामगारांनी केली आहे. या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर, १ नोव्हेंबर रोजी संप करण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे.