Navale Bridge Crash: 8 Dead, 20+ Vehicles Hit – पुण्याच्या नवले पुलावर आज सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास एका कंटेनरचे ब्रेक फेल होऊन २०-२५ वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. याच दुर्घटनेत दोन कंटेनर एकमेकांना धडकून मोठी आग लागली. या दोन कंटेनरमध्ये एक चारचाकी अडकली होती.
आगीमुळे या गाडीतील प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. एक तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. यावेळी साताऱ्याहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने २०- २५ वाहनांना धडक दिली. त्यानंतर तो शेवटी कंटेनरला धडकला. हा कंटेनर सातार्याहून पुण्याच्या दिशेने जात होता.
स्थानिकांनी सांगितले की, नवले पुलावर कंटेनरने अनेक मालवाहतूक गाड्या, दुचाकी, ट्रॅव्हल्स बससह अनेक वाहनांना धडक दिली. सुमारे २ किमीपर्यंत कंटेनर वाहनांना धडक देत होता. हा रस्ता उताराचा असल्यामुळे नियंत्रण मिळवणे अशक्य झाले असावे. या अपघातनंतर अनेक जखमी रस्त्यावर पडले होते. त्यांना येणाऱ्या वाहनांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. येथे आठवड्यातून १ -२ अपघात घडत असतात.
याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्सपोस्ट करून या अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला.
पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 13, 2025
या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये…
पुण्यातील नवले पुलाजवळ दोन कंटेनरची झालेली धडक आणि त्यामध्ये एका कारचा झालेला भीषण अपघात तसेच त्यानंतर लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी असून मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 13, 2025
हे देखील वाचा –
अभियंत्याला चापटी मारणे माजी आमदार गीता जैन यांना भोवले
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीसाठी केंद्र-राज्य सरकार कटिबद्ध ; फडणवीस यांचे आश्वासन
नारायण राणेंनी शिवसेना सोडली त्यावेळी झालेल्या दंगलीतील सर्व निर्दोष









