New mumbai airport- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय विमानतळाचे (New mumbai airport) उद्घाटन झाले. हे विमानतळ दोन महिन्यांनी सुरू होणार आहे. मुंबई भुयारी मेट्रो लाईन -3, मुंबई वन अॅप आणि तंत्रज्ञान आधारित कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचेही त्यांनी उद्घाटन केले. उद्या ते मुंबईत फिन्टेक कार्यक्रमात सहभागी होतील. आजच्या कार्यक्रमात मोदींनी सांगितले की, यानंतर वाढवण बंदर आणि तिसरी मुंबई हे लक्ष्य असणार आहे.
पंतप्रधान मोदी यांचे विमान आज नवी मुंबई विमानतळावर उतरले. त्यानंतर त्यांनी विमानतळाची पाहणी केली. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जपानचे राजदूत ओणु केइजी, उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह मंत्री व नेते उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आज केलेल्या प्रकल्पांचे लोकार्पण म्हणजे राज्याच्याच नाही तर देशाच्या विकासाचे प्रतिक असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज मी लोकनेता दि. बा. पाटील यांचे स्मरण करतो. त्यांचे जीवन प्रेरणादायी आहे. भारताच्या नव्या पिढीच्या उड्डाणांचा हा काळ आहे. हे विमानतळ म्हणजे विकसित भारताचे प्रतिक आहे. या विमानतळामुळे शेतकरी युरोप आणि इतर देशांना शेतमाल पाठवू शकतील, मच्छीमारांना त्यांचा माल निर्यात करणे सुलभ होईल. स्वप्न वास्तवात आणण्याची शक्ती असेल तर फळही मिळते. हवाई चप्पल घालणारा हवाई प्रवास करील असे मी 2014 साली सांगितले होते. त्यासाठी विमानतळे बांधणे गरजेचे होते. 2014 पूर्वी देशात 74 विमानतळे होती. आता 160 पेक्षा जास्त विमानतळे आहेत. उडान योजनेमुळे विमानाची स्वस्त तिकिटे मिळू लागली आहेत. विमानतळामुळे या भागांचा विकास होईल. उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, देशात असेही लोक आहेत जे देशाच्या विकासात अडथळे आणतात. आज मेट्रोचे उद्घाटन झाले त्यात असे लोक होते. मी उद्घाटन केले, पण अशांची सत्ता आली ज्यांनी त्याचे कामांना स्थगिती दिली. यामुळे या कामावरील खर्च वाढला, पाच वर्षे मुंबईकरांना सुविधा मिळाल्या नाहीत. हे पाप आहे.
काँग्रेसवर टीका करीत ते पुढे म्हणाले की, 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा जे सत्तेवर होते त्या काँग्रेस सरकारने दहशतवाद्यांपुढे गुढघे टेकले. अलीकडेच देशाचे गृहमंत्री राहिलेल्या एका काँग्रेस नेत्याने मुलाखतीत सांगितले की मुंबई हल्ल्यानंतर भारतीय सैन्य पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार होते. पण काँग्रेस नेत्याच्या आईने दुसर्या देशाच्या दबावात येऊन भारतीय सैन्याला पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून रोखले. हा कोण नेता होता हे जाहीर केले पाहिजे. काँग्रेसच्या कमजोरीची किंमत देशाला मोजावी लागली. पण आज भारत बदलला आहे. आता भारत घरात घुसून हल्ला करतो. त्यानंतर मोदी म्हणाले की जीएसटीत सुधारणा झाल्याने वस्तू स्वस्त झाल्या. यावेळी नवरात्रीत रेकॉर्ड ब्रेक खरेदी झाली. आमचे सरकार देशवासीयांसाठी अशाच योजना आणेल. माझी विनंती आहे की स्वदेशी वापरा. देशाचा पैसा देशात राहील. यामुळे देशात रोजगार वाढेल.
सुरूवातीच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,या विमानतळाची दहा वर्षात जी कामे झाली नव्हती ती सर्व कामे नरेंद्र मोदी यांच्या एका बैठकीमध्ये पूर्ण झाली. हे विमानतळ महाराष्ट्र आणि भारताच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. हे एकच विमानतळ महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता ठेवतो. हे विमानतळ पूर्ण होण्यापूर्वीच अटल सेतू तयार झाला. हे देशातील पहिले वॉटर टॅक्सी कनेक्टिव्हिटी असलेले विमानतळ आहे. थेट गेट वे ऑफ इंडिया पर्यंत वॉटर टॅक्सीने जाता येईल अशी व्यवस्था केली आहे. 40 किमी भूमिगत मेट्रो देखील अनेक अडथळे पार पाडत नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार पाठीशी असल्याने पूर्ण झाली. देशातील सर्वात मोठी भूमिगत मेट्रो आपण मुंबईत तयार करू शकलो याचा मला अभिमान आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे यात अनेक अडथळे आले. मात्र ते आपण पार केले .
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,आजचा दिवस मुंबई आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. या विमानतळामुळे आर्थिक विकासाला नवी दिशा मिळून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अकरा वर्षातील विकासाच्या प्रवासात महाराष्ट्र कायम अग्रेसर राहील. पूरामुळे आलेल्या संकटाच्या काळात महाराष्ट्राला मदतीचा हात नरेंद्र मोदी देतील. कारण महाराष्ट्राने साद दिली त्यावेळी मदतीसाठी मोदी यांनी कायम प्रतिसाद दिला आहे.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,राज्याचा विकास डबल वेगाने सुरू आहे. मेट्रोमुळे मुंबईत एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत प्रवासासाठी एकच तास लागेल. महाविकास आघाडी सरकारने स्थगित केलेले प्रकल्प महायुतीने पुन्हा सुरू करून स्पीडब्रेकर हटवले. पूरग्रस्त शेतकर्यांसाठी 32 हजार कोटींचे पॅकेज देऊन दिवाळी काळी होऊ दिली नाही. नरेंद्र मोदी सरकारकडून मदतीचा पाचपट निधी महाराष्ट्राला मिळाला आहे.
दि. बा. पाटील नावाची घोषणा झालीच नाही
आज नवी मुंबई येथील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची कोणतीही घोषणा झालीच नाही. संपूर्ण विमानतळावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच नाव झळकत होते. दि. बा. पाटील यांच्या दोन्ही पुत्रांना व्हीआयपी पास दिले इतकेच झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. बा. पाटील यांचे फक्त एक वाक्यात स्मरण केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही एकच वाक्यात स्मरण करून विषय संपवला. दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांनी तर दि. बा. पाटील या नावाचा उच्चारही केला नाही. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या भाषणात केवळ पंतप्रधान मोदी यांच्या कौतुकाचे मनोरे रचले.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीची मुंबईत ८ ठिकाणी छापेमारी
रेल्वेच्या कन्फर्म तिकिटाची तारीख आता बदलता येणार
लातूरमध्ये आरक्षणासाठी आत्महत्येच्या बनावट चिठ्ठ्या ! तपासात खुलासा