Opp. Thrown Papers at Manmohan Singh – दिवंगत डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना संसदेत विरोधी खासदारांनी कागद फाडून उधळल्याचा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संसदेत सध्या सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे.
लोकसभेत माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा दाखला देत काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर वक्तव्य केल्यानंतर संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये तीव्र गदारोळ झाला. सभागृह सुरू असतानाच कागद फाडून भिरकावण्यात आले.
विरोधी पक्षाचे काही खासदार थेट लोकसभेचे अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले आणि त्यांनी कागद भिरकावले. या गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी कागद भिरकावणाऱ्या खासदारांवर कारवाई करत त्यांना उर्वरित सत्रासाठी निलंबित केले.
याच पार्श्वभूमीवर डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना संसदेत झालेल्या गोंधळाचा व्हिडीओ ‘एक्स’वर प्रतिक पाटील या वापरकर्त्याने पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना संसदेत कागद फाडले गेले, घोषणाबाजी झाली, तरीही त्यांनी जबाबदारी टाळली नाही. ते सभागृहात उभे राहिले, विरोधकांना सामोरे गेले आणि प्रश्नांची उत्तरे दिली. आज परिस्थिती उलटी दिसते.
नरेंद्र मोदी यांच्या काळात संसदेत चर्चा टाळली जाते, अस्वस्थ प्रश्नांपासून दूर राहिले जाते आणि हल्ल्याची भीती अशा कथांमागे आश्रय घेतला जातो. लोकशाहीत बहुमत म्हणजे मनमानी नसून त्यातून उत्तरदायित्व अधिक वाढते. देश महत्त्वाच्या प्रश्नांवर उत्तरांची अपेक्षा करत असताना पंतप्रधानांनी लोकसभेत उपस्थित राहून थेट संवाद साधणे ही किमान जबाबदारी असते. नेतृत्व म्हणजे टीकेला सामोरे जाणे टाळणे नव्हे.
६ फेब्रुवारी रोजी संसदीय इतिहासात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. लोकसभेत काल काँग्रेस व मित्रपक्षाच्या खासदारांनी आंदोलन केले, घोषणा दिल्या, महिला खासदारांनी हातात फलक घेऊन पंतप्रधानांची खुर्ची घेरली. त्यानंतर पंतप्रधान मोदी काल आणि आज लोकसभेत आले नाहीत. मोदी सरकार आल्यानंतर प्रथमच राष्ट्रपती अभिभाषणाचा धन्यवाद प्रस्ताव पंतप्रधानांचे भाषण न होताच आवाजी मतदानाने मंजूर केले. यानंतर आणखी धक्कादायक घटना घडली.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभा सभागृहात म्हटले की, काँग्रेसचे खासदार या सभागृहात पंतप्रधानांना इजा करणार होते. या षड्यंत्राची मला माहिती मिळाली. या सभागृहात अप्रिय घटना घडू नये म्हणून आज मीच पंतप्रधान मोदी यांना विनंती केली की, आपण सभागृहात येऊ नका. त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि ते आज सभागृहात आले नाहीत. मी त्यांचे आभार मानतो.
लोकसभा सभागृहात सभापतींनी काँग्रेस खासदारांवर इतका गंभीर आरोप करणे हे धक्कादायक आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वैतागून म्हणाल्या की, 3 खासदार त्यांच्या खुर्चीपर्यंत गेल्या म्हणून असे आरोप करणे मूर्खपणाचे आहे. पंतप्रधान हे सभापतींच्या मागे लपले हेच सत्य आहे.
लोकसभेत अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाल्यावर सभागृह स्थगित झाले.
त्यानंतर सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान मोदींचे राज्यसभा सभागृहात निवेदन सुरू झाले. त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करीत दोन तासांचे प्रदीर्घ भाषण केले. त्यांचे भाषण सुरू होताच विरोधकांनी ‘तानाशाही नही चलेगी, विरोधी पक्षनेत्याला बोलू द्या या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले आणि 10 मिनिटांनी सभात्याग केला. विरोधी खासदार सभागृहातून गेले आणि मोदींनी आपले भाषण पूर्ण केले.
हे देखील वाचा –
आसाम भाजपाकडून मुस्लीमविरोधी पॉइंट ब्लँक शॉट व्हिडिओ पोस्ट ! काँग्रेस संतप्त








