Home / News / Orange Alert in 5 Districts : पाच जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट! धरणांतून विसर्गामुळे पूर कायम

Orange Alert in 5 Districts : पाच जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट! धरणांतून विसर्गामुळे पूर कायम

Orange Alert in 5 Districts – राज्यात मुसळधार पावसाचे थैमान आजही सुरू राहिले. त्यामुळे अनेक नद्यांना उधाण आले. धरणांतून मोठ्या...

By: Team Navakal
Orange Alert in 5 Districts


Orange Alert in 5 Districts – राज्यात मुसळधार पावसाचे थैमान आजही सुरू राहिले. त्यामुळे अनेक नद्यांना उधाण आले. धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीकाठच्या भागातील पूरस्थिती आणखी बिकट झाली. नाशिकच्या बागलाणमध्ये भिंत कोसळल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis)यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज सकाळी संपर्क साधून मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला. मात्र, अनेक ठिकाणी सरकारी मदत अजूनही न पोहोचल्याने पूरग्रस्तांचे हाल कायम राहिले. दरम्यान, हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक या पाच जिल्ह्यांसाठी  ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.


मुंबईसह उपनगर परिसरात काल रात्रीपासून विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत होता. यामुळे दादर, घोडबंदर परिसरात पाणी साचले. अंधेरी सबवे (अंधेरी पश्चिम) येथे एक ते दीड फूट पाणी होते. कुर्ला रेल्वे स्थानक, मानखुर्द, टिळक नगर, शीव, मालाड, बोरिवली, कांदिवली, सांताक्रूझ हा सखल भाग पाण्याखाली गेला. कुलाबा 71.98 मिमी, पूर्व उपनगर 70.44 मिमी आणि पश्चिम उपनगरात 81.42 मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक शहर व परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले. 12 तासांत 62 मिमी पावसाची नोंद झाली.

या हंगामात आतापर्यंत 1,005 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे गंगापूर, दारणासह विविध धरणांतून नदीपात्रात विसर्ग वाढवला. त्यामुळे गोदावरी, नंदिनी, भावली, भाम व इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. नाशिक महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. नदीकाठच्या वस्तीतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले.





रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे आणि इतर महामार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. येवला आणि विंचूर भागातील शॉपिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. बल्हेगाव येथील पोल्ट्री फॉर्मची भिंत कोसळल्याने 800 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे पूरग्रस्त भागाचा दौरा करून आढावा घेतला.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती उद्भवली. डोंगरी नदीला महापूर आला. त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या काळात चाळीसगावचे चंडिका देवी मंदिर बंद करावे लागले. डोंगरीसह तितुर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले.
अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस पडल्याने अनेक गावांना फटका बसला. पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात 100 हून अधिक बंधारे फुटले. 2 लाख 3 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले. बचाव पथकांनी 1,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले. राहाता तालुक्यात झेंडू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर नगर-मनमाड महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला.

राहाता तालुक्यात 150 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. शिर्डीमध्ये घरांत पाणी शिरले. एका नवरात्र उत्सव मंडळाचा मंडप कोसळला. रात्री दोन जण ओढ्यात वाहून गेले होते. पण प्रशासनाने त्यांना वाचवले. जिल्ह्यातील देवटाकळी येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवण्यात आले.


संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात हडसपिंपळगाव येथील वयोवृद्ध गणपत त्र्यंबक निघोटे पुरात अडकले होते. उबाठा नेते अंबादास दानवे यांनी बचाव पथकाच्या मदतीने त्यांना वाचवले. संभाजीनगरमधील शिवना नदीला प्रचंड पूर आल्याने मुंबई-नागपूर महामार्ग पुरामुळे बंद झाला. त्यामुळे नागपूर-मुंबईचा संपर्क तात्पुरता तुटला.


धाराशिव जिल्ह्यात अडीच महिन्यांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत केले आहे. शिलवडीतील राम नदीला आलेल्या पुरामुळे विद्यार्थ्यांचा शाळेला जाण्याचा मार्ग बंद झाला. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. भूम तालुक्यातील पाठसांगवीत रस्ता बंद झाल्याने शेतकऱ्याने 120 लीटर दूध नदीत ओतले. कळंब तालुक्यातील संजीतपूर गावाचा संपर्क तुटल्याने महिलेला उपचारासाठी ट्रॅक्टरमधून न्यावे  लागले.  

पावसामुळे 78 शाळांमधील 125 खोल्यांची पडझड झाली. तेरणा नदीच्या पुरामुळे धाराशिव-लातूर रस्ता तीन दिवसांपासून बंद असून गावांचा संपर्क तुटला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील नांदा गावात कांबळी आणि मेहेकरी नद्यांच्या पुरामुळे घरे आणि शाळांत पाणी शिरले. परभणी जिल्ह्यात 48 तासांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.

परभणीतील 52 पैकी तब्बल 30 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. पालममध्ये सर्वाधिक 153.3 मिमी पावसाची नोंद झाली. पावसासोबतच धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे गोदावरीसह गळाटी, पूर्णा, नाल्यांना पूर आला. त्यामुळे नदीकाठावरील अनेक गावांचा संपर्क तुटला आणि प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले. पालम, गंगाखेड, पूर्णा तालुक्यांत पूरस्थिती गंभीर असून, गंगाखेड-पालम, पूर्णा-नांदेड आणि राणीसावरगाव रस्ते बंद करण्यात आले आहेत. पुरात अडकलेल्या पाच नागरिकांची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व पोलीस प्रशासनाने सुखरूप सुटका केली.

धरणांतून विसर्ग
शहापूर तालुक्यातील  तानसा, भातसा, वैतरणा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाचे पाच दरवाजे साडेतीन मीटर उघडले. त्यातून 66 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मोडकसागर धरणातून 48 हजार 223 क्युसेक आणि तानसा धरणातून 41 हजार 999 क्युसेक पाणी सोडण्यात आले.

मराठवाड्यातील प्रमुख धरण असलेल्या जायकवाडीतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. 18 नियमित आणि 9 आपत्कालीन दरवाजे उघडून गोदावरी नदीत 1 लाख 98 हजार 72 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. पुण्यात खडकवासला धरणातून मुठा नदीत 10 हजार क्युसेकपेक्षा अधिक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

राहाता तालुका व परिसरात  सकाळी 6 पर्यंत झालेली अतिवृष्टी
शिर्डी – 178 मिमी
राहाता – 200 मिमी
कोळगाव – 114 मिमी
सोनेवाडी – 107 मिमी
रांजणगाव – 165 मिमी
चितळी – 116 मिमी
सोनगाव – 162 मिमी
देवळाली- 133 मिमी
मुसळवाडी- 127 मिमी
लोणी- 130 मिमी
खंडाळा- 173 मिमी
श्रीरामपूर- 110 मिमी
वडाळा- 113 मिमी
कारेगाव- 101 मिमी
बेलपिंपळगाव- 123 मिमी


हे देखील वाचा –

पाकिस्तान तिसऱ्यांदा चारीमुंड्या चीत भारतीय संघाने आशिया चषक जिंकला

जम्मू-काश्मीरचे मिथुन मन्हास बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

41 वर्षांनंतर पहिल्यांदाच आशिया कपच्या अंतिम फेरीत India vs Pakistan भिडणार; मोफत कुठे पाहू शकता सामना?

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या