Raj Wants Congress : Raut – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे मनसेला महाविकास आघाडीत सोबत घेण्याबाबत नकारात्मक सूर आळवण्यात आल्यानंतर काँग्रेसचा विरोध कमी व्हावा म्हणून आता राज ठाकरेंनाच काँग्रेस आपल्यासोबत असावी, असे वाटत असल्याचे वक्तव्य शिवसेना(उबाठा) नेते व खासदार संजय राऊत यांनी आज केले आहे.
काँग्रेसचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी मनसेला सोबत घेण्याबाबत निर्णय घेतील, असे सांगत आता राज यांच्या समावेशाचा चेंडू काँग्रेस श्रेष्ठींच्या कोर्टात असल्याचे स्पष्ट संकेतही राऊत यांनी दिले आहेत. मात्र मनसे बाबतचा निर्णय राज ठाकरेच घेतील आणि ते स्वतः किंवा मनसे प्रवक्तेच निर्णय जाहीर करतील असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.
मुंबईत माध्यमांशी बोलताना राऊत यांनी सांगितले की, काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, त्यांचे नेतृत्व दिल्लीत असल्याने ते दिल्लीमध्ये निर्णय घेतील.
शिवसेना(उबाठा) आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असताना महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मात्र मुळातच महाविकास आघाडीत येण्यास मनसे इच्छूक आहे का ? असा प्रश्न राऊत यांना सोमवारी विचारण्यात आला.
या प्रश्नाचे उत्तर देताना राऊत यांना सांगितले की, स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की काँग्रेस आपल्यासोबत असावी. ही राज ठाकरेंची भूमिका आहे, निर्णय नाही. प्रत्येकाचे या राज्यात एक स्थान आहे. उबाठा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) या पक्षांचे, डाव्या पक्षांचे स्थान आहे.
काँग्रेस हा देखील महाराष्ट्रातील एक महत्वाचा पक्ष आहे. काही निर्णय घेताना शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश होण गरजेचा आहे ही आमची भूमिका आहे. तीच राज ठाकरे यांची देखील आहे असे राऊत म्हणाले. मात्र याविषयावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
महायुतीने राऊतांच्या या वक्तव्यावर टीका केली . भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की,
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करीत असतात. अशा पक्षासोबत राज ठाकरे जातील असे वाटत नाही. राऊत यांनी कितीही सुपारी घेतली तरी त्यांना मनसे संपवता येणार नाही,असेही भाजपने म्हटले आहे.
भाजपच्या सुरात सूर मिसळत शिंदे गटानेही काँग्रेसवर निशाणा साधला.
कोणत्या पक्षाने कुणासोबत जायचे याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतची काँग्रेसची भूमिका जगजाहीर असताना अशा पक्षासोबत राज ठाकरे जातील असे वाटत नाही, असे शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत म्हणाले.
हे देखील वाचा –
डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा घुमजाव क्षी जिनपिंग यांची प्रशंसा केली