मुंबई – ५१२ कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या खातेदारांना विशेष आमदार-खासदार न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. बँकेचे माजी अध्यक्ष विवेकानंद पाटील यांच्या दोन मोठ्या मालमत्तांचा लिलाव करण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
नवी मुंबईतील ५० हजार चौरस मीटर भूखंडावर वसलेले कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी आणि पोसरी गावातील एक भूखंड या दोन मालमत्तांचा लिलाव होणार आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पाटील यांच्या विरूद्ध ५१२ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पाटील यांच्या व्यतिरिक्त बँकेच्या १२ कर्मचाऱ्यांसह एकूण ७६ जणांच्या विरोधात ईडीने या प्रकरणी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत पाटील यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेसह एकूण ८७ मालमत्ता जप्त केल्या आहेत. पाटील हे शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित आहेत. या प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयानेही गुन्हा दाखल केला असून स्वतंत्रपणे काही मालमत्ता जप्त केल्या आहेत. या घोटाळाग्रस्त बँकेवर लिलाव करण्यासाठी सक्षम अधिकारी नेमण्यात आला असून मालमत्तांच्या लिलावातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून ठेवीदारांचे पैसे परत केले जाणार आहेत.