Rohit Pawar Black Box Controversy – विमानातील ब्लॅक बॉक्स पाणी, आग आणि बॉम्बस्फोट अशा सर्व संकटांपासून सुरक्षित असतो. त्यामुळे कितीही मोठा अपघात झाला तरी त्याचे नुकसान होत नाही. या बॉक्समुळेच अपघाताची खरी माहिती मिळते. परंतु अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर त्याचा ब्लॅक बॉक्स सापडलेला नाही.
हा ब्लॅक बॉक्स अपघातात जळाला असे म्हटले जात असल्याने या अपघाताबाबतचा संशय गडद होत आहे. याबाबत रोहित पवार उद्या सकाळी 10 वाजता गौप्यस्फोट करणार आहेत.अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी ब्लॅक बॉक्स जळाला तर काहीच माहिती मिळणार नाही असे वक्तव्य करून याबाबत चर्चेला सुरुवात केली. त्यावर रोहित पवार म्हणाले होते की, हे मुद्दाम तर बोलले जात नाही ना?
ब्लॅक बॉक्स जळाला म्हणायचे म्हणजे मग सर्व गुपिते लपवता येतात. काल मिटकरी यांनी ब्लॅक बॉक्स कसा जळतो त्याची सविस्तर माहिती पोस्ट केली. त्यानंतर आज त्यांनी घुमजाव करीत म्हटले की, या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही. हा विषय लावून धरणारे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा या अपघातात राजकारण सुरू असल्याचा संशय व्यक्त करत ब्लॅक बॉक्स आणि अपघाताच्या इतर गोष्टींबद्दल उद्या गौप्यस्फोट करणार असल्याचे जाहीर केले .
ईडीने दाखल केलेल्या एका खटल्यानिमित्त रोहित पवार मुंबईत आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास संथ गतीने सुरू आहे. त्याबाबत आणि ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या वृत्तावर आपण उद्या सकाळी साडेदहा वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलणार आहे. ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांचा अपघात हा संशयास्पद आहे. त्याचा तपास संथ गतीने सुरू आहे.
आजही व्हिआरएस कंपनी विमानसेवा चालवत आहे. त्यावरून राज्य सरकार तपासाबाबत किती गंभीर आहे हे दिसून येते. आम्ही जी भीती काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती, तेच आता सांगितले जात आहे. ब्लॅक बॉक्स जळाला, तो आता परदेशात पाठवावा लागणार वगैरे जे काही चालले आहे ते संशय वाढवणारे आहे. सरकारकडून या तपासाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणी काही अधिक माहिती मिळते का ते पाहत आहोत.
ऊन, वारा, पाऊस, आग आणि बॉम्बस्फोट अशा सर्व संकटांपासून सुरक्षित असतो, पण राजकारणापासून सुरक्षित नाही. आता यात काय राजकारण सुरू आहे, हे आपल्याला पाहावे लागेल. खोलात जावे लागेल. याबाबतीत उद्या कोणत्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आल्या आहेत, त्या तुमच्यापुढे मांडणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार यांच्या अपघातानंतर त्यांच्या पक्षाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी, विमानातील ब्लॅक बॉक्स कोणकोणत्या कारणाने जळू शकतो किंवा नष्ट होऊ शकतो, याविषयी माहिती समाज माध्यमावर पोस्ट केली होती. अपघातानंतर लागलेली आग जर 1,100 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल किंवा ती आग 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली तर आतील घटक विशेषतः फ्लॅश मेमरी उष्णतेमुळे खराब होऊ शकते.
अत्यंत जोराचा म्हणजे 3,400 जीएस पेक्षा जास्त धक्का (जो सामान्य, अगदी प्राणघातक अपघातांपेक्षाही खूप जास्त असतो) बसल्यास ब्लॅक बॉक्स पूर्णपणे नष्ट होऊ शकतो. तसेच खोल समुद्रात दीर्घ काळ खार्या पाण्यात राहिल्यास त्याला गंज चढू शकतो. त्यामुळे डेटा नष्ट होण्याची शक्यता असते. मात्र ब्लॅक बॉक्स 30 दिवसांपर्यंत उच्च दाब सहन करण्यासाठी बनवलेला असतो, असे मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
मिटकरी यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी आज असे सूचक विधान केले की, अपघाताच्या तपासातून काहीही हाती लागणार नाही, याची तयारी मिटकरी यांच्या या पोस्टमुळे सुरू झालेली दिसते. विशेष म्हणजे, आज रोहित पवार यांनी संशय व्यक्त करताच अमोल मिटकरी यांनी यु-टर्न घेतला. त्यांनी आणखी एक पोस्ट करून लिहिले की, विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचे कारणच हे असते की ज्यावेळी विमानाचा अपघात होतो त्यावेळी अनेकदा असे निदर्शनास आले आहे की, विमानाची शेपटी ही पूर्णपणे जळत नाही. अपघात झाला त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे.
ती अजिबात जळालेली नाही. त्यामुळे या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. ब्लॅक बॉस असा बनवला गेला असतो की उच्च तापमानात कितीही आग लागली तरीही तो जळून खाक होत नसतो. त्यामुळे आता हा प्रश्न उपस्थित होतो की, अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळाला?
दरम्यान, या अपघाताच्या तपासकार्याबाबत संशय व्यक्त केला जात असताना विमान अपघात तपास ब्युरोने याबाबत आज एक परिपत्रक जारी करून माहिती दिली की, 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या लिअरजेट 45 विमानाच्या अपघाताची विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) सविस्तर चौकशी करत आहे. या विमानात दोन स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर होते. अपघातादरम्यान दोन्ही फ्लाईट रेकॉर्डर बराच काळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात होते. आगीमुळे त्यांचे नुकसान झाले. मात्र, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर एएआयबीच्या फ्लाईट रेकॉर्डर प्रयोगशाळेत यशस्वीरित्या डाऊनलोड करण्यात आला आहे. तसेच कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरची सविस्तर तांत्रिक तपासणी सुरू आहे. यातील डेटा पुन्हा मिळावा, याकरता विशेष मदतीसाठी उत्पादकांच्या मान्यताप्राप्त प्रतिनिधींशी संपर्क साधण्यात आला आहे.
विलीनीकरणावर पूर्णविराम
रोहित पवार यांनी दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, ते (अजित पवार गट) आमदारांना बोलावतात. त्यांना रांगेत बसवतात आणि सांगतात की, बाहेर विलीनीकरणाबद्दल काही बोलू नका. अजितदादा एनडीएबरोबर जाणार होते की, बाहेर रस्त्यावर येऊन आमच्यासोबत संघर्ष करणार होते हे आमच्यात ठरले होते.
आज दादा नाहीत. त्यामुळे या विषयावर चर्चा करणे गौण आहे. आमच्याकडून या विषयावर पूर्णविराम लागलेला आहे. मुद्दामून त्या पक्षाचे नेते आपले महत्त्व वाढवायचे आहे म्हणून सारखा सारखा तो विषय काढतात. अजित पवार हे जयंत पाटील यांच्या घरी भेटायचे. जयंत पाटील यांच्या घरासमोर लोढासाहेबांचे घर आहे. दीड वर्षांतील तिथले सीसीटीव्हीफुटेज काढा. म्हणजे
अजितदादा 13-14 वेळा भेटले ते समजेल.
हे देखील वाचा –
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स खरोखर जळाला आहे का?











