Rohit Pawar in Trump Aadhaar Case – शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बनावट आधारकार्ड तयार केल्याच्या प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा भाजपाच्या तक्रारीनंतर नोंदवण्यात आला आहे.
रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन बोगस आधारकार्ड कसे तयार करता येते याचे प्रात्यक्षिक दाखवले होते. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो वापरून अवघ्या २० रुपयांत आधारकार्ड तयार करून दाखवले. अशा प्रकारचे बनावट आधारकार्ड दुबार मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड तयार करणे हा गुन्हा आणि देशविरोधी कृत्य असल्याचे सांगत भाजपाचे समाज माध्यम सहसंयोजक धनंजय वागस्कर यांनी पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर मुंबईतील दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला अशी माहिती भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी दिली.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, जर मी स्वतः सांगितले की ते आधारकार्ड बनावट आहे, तर यासाठी १५ दिवस चौकशी करण्याची गरज काय होती? गृह विभागाकडे एवढा रिकामा वेळ असेल तर डॉ. संपदा मुंडे, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, संतोष देशमुख, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रकरण अशा अनेक प्रकरणांच्या तपासाला गती द्यावी.
हे देखील वाचा –
भिवंडीत विकृतपणाचा कळस! वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या.
सुदानमध्ये युद्ध चिघळले ; ४८ तासांत २००० हुन अधिक नागरिकांची हत्या..









