Rohit Sharma Denied ODI Captaincy – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांच्या मालिकांसाठी आज भारतीय संघाची घोषणा झाली. यात एकदिवसीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडून काढण्यात आले असून, कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या शुभमन गिलकडे आता या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.
या निर्णयामुळे भारताला चॅम्पियन ट्रॉफी आणि टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून देणार्या मुंबईकर रोहित शर्माची कारकिर्दच संपुष्टात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
मुख्य निवडकर्ते अजित आगरकर म्हणाले की, 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्मा किंवा विराट कोहली खेळतील की नाही हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे रोहितला कर्णधार म्हणून निवडण्यात आलेले नाही.
या संदर्भात त्याच्याशी सल्लामसलत करण्यात आली आहे. या निर्णयाचा त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला विजय मिळवून देण्याशी काही संबंध नाही. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नसती, तरी तो भारतासाठी किती उपयुक्त खेळाडू आहे, हे लक्षात घेतले, तर हा एक अत्यंत कठीण निर्णय असता. परंतु संघाला कधीतरी भविष्याचा विचार करावा लागतो.
गिलला एकदिवसीय कर्णधार म्हणून स्थिरावण्यासाठी शक्य तितके सामने द्यायचे होते. ज्यामुळे ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी हा निर्णय घेण्यात आला. आगरकर असेही म्हणाले की, तीनही प्रकारांसाठी तीन कर्णधार असणे शक्य नाही. त्यामुळे गिलला दोन फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. तर सूर्यकुमार यादव भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व करणार आहे.
या एकदिवसीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा समावेश करण्यात आला आहे. रोहित आणि विराटने शेवटचा एकदिवसीय सामना यावर्षी 9 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून दूर झाल्यावर रोहित फार काळ क्रिकेट खेळेल याबद्दल शंका आहे.
त्यामुळे लवकरच रोहितच्या कारकिर्दीची अखेर होईल, असे मानले जात आहे. तो कसोटी आणि टी-ट्वेंटी क्रिकेटमधून आधीच निवृत्त झाला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यानेही बीसीसीआयच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, रोहित भारतीय संघाचा आधारस्तंभ आहे.
कर्णधार म्हणून त्याने भारताला चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली होती. त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत शेवटची संधी मिळायला हवी होती.ऑस्ट्रेलिया दौर्यावर भारतीय संघ 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळणार आहे. यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली, तर त्याला टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले.
हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत दुखापतीमुळे या दोन्ही मालिका खेळणार नाहीत.पहिला एकदिवसीय सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थ येथे खेळला जाईल. दुसरा सामना 23 ऑक्टोबरला अॅडलेडमध्ये आणि तिसरा सामना 25 ऑक्टोबर रोजी सिडनीत खेळला जाईल. त्यानंतर 5 सामन्यांची टी-20 मालिका होईल.
एकदीवसीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल.
टी-20 संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर.
हे देखील वाचा
रिया चक्रवर्तीला 5 वर्षांनी परत मिळाला पासपोर्ट; भावनिक पोस्ट करत म्हणाली
RBI चा मोठा निर्णय! आता प्रत्येक बँकेत ‘हे’ खाते अनिवार्य; ‘झिरो बॅलन्स’सह मिळणार अनेक मोफत सुविधा