मुंबई– अभिनेता सैफ अली खान (Bollywood actor Saif Ali Khan) याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीने मुंबईच्या सत्र न्यायालयात जामीनासाठी याचिका (petition) दाखल केली आहे. आपल्या विरोधातील आरोपांत काही तथ्य नसून पोलिसांनी ही काल्पनिक कथा तयार केल्याचे त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे. न्यायालयाने या संदर्भात फिर्यादी पक्षाला बाजू मांडायला सांगितले असून यावरील सुनावणी उद्या होणार आहे.
सैफ अली खानवर त्याच्या वांद्र्यातील निवासस्थानी हल्ला (attacked) करण्यात आला होता. त्यावेळी आरोपीने त्याच्या घरात प्रवेश करुन त्याच्यावर वार केले होते. त्यानंतर सैफ अली खानला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी शरीफूल फकीरला (Shariful)पोलिसांनी १९ जानेवारीला अटक केली होती. आरोपीच्या वतीने विपुल दुशिंग यांनी सत्र न्यायालयात त्याची बाजू मांडली. ते म्हणाले की, त्याच्याविरोधात अद्याप कोणतेही ठोस पुरावे देण्यात आलेले नाही. तपास यंत्रणेने या आधीही अनेक लोकांना केवळ संशयावरुन अटक केली होती. त्यानंतर त्यांनी फकीरला अटक केली. सध्या त्याच्या विरोधातील सर्व पुरावे, सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage)व कॉल रेकॉर्डही पोलिसांकडेच आहेत.
आरोपी कोणत्याही साक्षीदारावर (witnesses) दबाव टाकण्याची शक्यता नाही व इतके दिवस त्याला विनाकारण कैदेत ठेवणे योग्य नाही. पोलिसांनी आतापर्यंत त्याला अटक करण्याची कारणेही दिलेली नाहीत. त्यामुळे त्याची अटकही बेकायदेशीर आहे. कोणत्याही आरोपीला अटक करण्याआधी त्याला अटक करण्याची कारणे देणे अनिवार्य आहे. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात यावा. उद्या पोलीस त्यांची बाजू न्यायालयात दाखल करतील. त्यानंतर त्याच्या जामीनावर न्यायालय निर्णय घेईल.