नवी दिल्ली- होळीच्या दिवशी घरात मोठ्या प्रमाणात जळलेल्या नोटा सापडलेले तत्कालिन दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा (Justice Yashwant Varma)यांच्या सुनावणी दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर तीव्र ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चौकशी समितीसमोर का उपस्थित राहिलात, त्याला तिथेच आव्हान का दिले नाहीत असा प्रश्न केला.
न्या वर्मा यांच्या दोन याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात न्या. दीपांकर दत्ता (Justices Dipankar Datta) व न्या. एजी मसीह (A.G. Masih) यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने म्हटले की, तुम्ही अंतर्गत चौकशी समितीसमोर जायला नको होते. त्याला तिथेच आव्हान द्यायला हवे होते. तुमच्या वर्तनातून तुम्ही तुमच्याविषयी विश्वास निर्माण करू शकला नाहीत. समितीचा अहवाल येण्याआधीच तुम्ही सर्वोच्च न्यायालयात यायला हवे होते. न्या. वर्मा यांची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल (Kapil Sibal)म्हणाले की, त्यांना सेवेतून काढण्याची समितीची शिफारसच घटनाबाह्य आहे.
न्या. वर्मा आधी सर्वोच्च न्यायालयासमोर आले नाहीत. कारण त्यांचा व्हिडिओ आधीच प्रसारित झाला होता व प्रतिष्ठेची व्हायची ती हानी झाली होती. अॅड. मॅथ्यूज जे. नेदुम्परा यांनाही सर्वोच्च न्यायालयाने विचारले की, त्यांनी न्या. वर्मा यांच्या विरोधात प्राथमिक अर्ज दाखल करण्याआधी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती का? या सुनावणीनंतर न्या. वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दोन याचिकांवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.