Stampede at Thalapathy Vijay’s Rally – लोकप्रिय तमिळ अभिनेता-नेता विजय थलापती (Thalapathy Vijay)यांच्या करूर येथील प्रचारसभेत काल झालेल्या चेंगराचेंगरीतील (Rally Stampede )मृतांचा आकडा ४० वर गेला आहे. मृतांमध्ये १६ महिला आणि १० मुलांचा समावेश आहे.
जखमींची संख्याही ९५ वर पोहोचली आहे. यापैकी ५१ जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. या प्रकरणी पोलिसांनी विजयच्या तमिळगा वेट्टी कझगम पक्षाच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
थलापती यांच्या टीव्हीकेने पक्षाने ही चेंगराचेंगरी म्हणजे निव्वळ एक अपघात नसून षडयंत्र आहे, असा दावा करत मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची उद्या दुपारी सुनावणी होणार आहे.
दुसरीकडे मृतांच्या नातेवाईकांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत विजय थलापती यांच्या प्रचारसभांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गृह मंत्रालयानेही राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी पहाटे दोन वाजताच्या सुमारास करूर येथे पोहोचत रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती अरुणा जगदीशन यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. द्रमुक सरकार विरोधी पक्षांच्या सभांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवत नसल्याचा आरोप अण्णा द्रमुक पक्षाने केला आहे.
५० वर्षांच्या विजय थलापती यांनी गेल्यावर्षी २ फेब्रुवारीला तमिळगा वेट्टी कझगम नामक नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून थलापतीने प्रचार सभांचा धडाका लावला होता. याचाच भाग म्हणून काल दोन सभा आयोजित करण्यात आल्या होत्या.
नमक्कल येथे होणाऱ्या पहिल्या सभेसाठी सकाळी पावणेनऊची वेळ घेण्यात आली होती. पण विजय येथे तब्बल सहा तास उशिराने दुपारी पावणेतीन वाजता पोहोचले. त्यामुळे आपल्या लोकप्रिय अभिनेता-नेत्याची झलक बघण्यासाठी भल्या पहाटेच सभास्थळी आलेल्या लोकांना उपाशीपोटीच ताटकळत प्रतीक्षा करावी लागली. येथेही चेंगराचेंगरीसारखा प्रकार घडला. त्यात काही जण जखमी झाले.
दुपारी पावणेचारला ही पहिली सभा संपवून थलापती करूरकडे रवाना झाले. या दुसऱ्या सभेसाठी दुपारी बारा वाजता पोहोचणे अपेक्षित होते. मात्र सात तास उशिराने सायंकाळी सात वाजून ४० मिनिटांनी ते सभास्थळी पोहोचले. त्यांचे चाहते सकाळीच या ठिकाणी पोहोचले होते.
यावेळी थलापती यांनी गर्दीत हरवलेल्या मुलीला शोधण्याचे आवाहन केले. त्यानंतर हा चेंगराचेंगरीचा प्रकार घडला आणि ४० जणांचा जीव गेला. आयोजकांनी केवळ १०,००० लोकांसाठी परवानगी घेतली असताना प्रत्यक्षात ५०,००० हून अधिक लोक जमले होते. त्यामुळे बेफाम गर्दीचे नियंत्रण करणे आयोजकांना व पोलिसांनाही शक्य झाले नाही.
या घटनेनंतर अभिनेता विजय यांनी एक्स हँडलवरून दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, करूरमधील घटनेबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी मृतांच्या कुटुंबियांना २० लाख आणि जखमींना २ लाख रुपयांची मदत जाहीर करू इच्छितो.
पण चेंगराचेंगरीच्या या घटनेनंतर ते ना जखमींना भेटले ना त्यांनी नातेवाईकांना धीर दिला. थेट खासगी विमानाने चेन्नईला रवाना झाले. त्यामुळे त्यांच्यावर असंवेदनशीलतेचा ठपका ठेवला जात आहे. या चेंगराचेंगरीने विधानसभा निवडणुकीआधी प्रचंड लोकप्रियता मिळवत असलेल्या विजय थलापतीच्या राजकीय वाटचालीला मोठा झटका बसला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनीही मृतांच्या वारसांना १० लाख आणि जखमींना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हे देखील वाचा –
चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आलेला शाह बानो खटला नेमका काय आहे? जाणून घ्या
भारत-पाकिस्तान अंतिम सामना ; उबाठाला अचानक बहिष्काराची पुन्हा आठवण झाली
बिहार निवडणुकीपूर्वी मोदी यांची भेट; महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये