Sunetra Pawar shifted the PCB HQ to Baramati – राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पुण्यातील वाकडेवाडी येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक कार्यालय थेट बारामतीला स्थलांतरित केले आहे. गंभीर बाब म्हणजे या निर्णयाची पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. हे मुख्यालय बारामतीला हलविल्याने पुणे जिल्ह्यातील प्रदूषणाबाबत तक्रार करायची असल्यास त्यांना बारामतीला जावे लागणार आहे.
पुण्याच्या वाकडेवाडी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक कार्यालय बारामती येथील भिगवण रस्त्यावरील यश प्राईम या इमारतीत हलवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुणे पालिका क्षेत्रातील एमआयडीसीचे कामकाज बारामतीतून चालणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 9 मार्च रोजी हा निर्णय घेतला. त्यानंतर 20 मार्च रोजी या कार्यालयाचे बारामती येथे लगेच स्थलांतर झाले. या निर्णयाला विरोध होऊ लागल्याने ही बाब चर्चेत आली.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी यासंबंधीची तक्रार राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे. ते म्हणाले, हा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याची गरज होती. हरकती व सूचना मागवणेही आवश्यक होते, पण कुणालाही कल्पना न देता हे कार्यालय स्थलांतरित केले. त्यामुळे आता पुण्यातील नागरिकांना बारामतीला जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. गंभीर बाब म्हणजे मंत्री मुंडे यांना व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनाही या निर्णयाची माहिती देण्यात आली नव्हती.
भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रार केली आहे. एमआयडीसीच्या भोर, जेजुरी, सासवड, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांसह मालेगाव नगरपंचायतीच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती आहेत. या परिसरात तब्बल 51 तर 72 लहान-मोठे उद्योग आहेत. कुरकुंभ, बारामती, जेजुरी व इंदापूर या 4 एमआयडीसीच्या औद्योगिक वसाहती, कात्रज हडपसर, रामटेकडी पर्वती व कोथरूड औद्योगिक वसाहत, पुणे महापालिकेच्या पाच क्षेत्रांतील औद्योगिक वसाहती आहे. या ठिकाणी कोणताही प्रश्न निर्माण झाला तर तो सोडवण्यासाठी आता बारामतीला यावे लागणार आहे.
हे देखील वाचा –
इराणवर होणार अणुहल्ला? संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्याचा दावा; दिला पदाचा राजीनामा
नीलम गोर्हे काळ्या हृदयाची व खोटारडी बाई ! किशोरी पेडणेकरांची खालच्या पातळीची टीका










