टेस्लाची मुंबईत पहिली शोरुम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन!

First Tesla Showroom in mumbai

मुंबई– प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क (Musk-run Tesla )यांच्या इलेक्ट्रिक वाहन (इव्ही) निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी टेस्लाने (Tesla )आज मुंबईतील बीकेसीमध्ये (Bandra Kurla Complex)भारतातील पहिल्या शोरूमचे उद्घाटन केले. भारतातील पहिल्या तथा आधुनिक शोरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. टेस्लाने आपल्या शोरूमच्या पाट्या मराठी (Marathi)आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लावून मराठी भाषेला विशेष मान दिला आहे. स्थानिक संस्कृती आणि भाषेचा आदर केल्याबद्दल फडणवीस (CM devendra fadnvis ) यांनी कौतुक केले.

टेस्लासारख्या जागतिक कंपनीचे महाराष्ट्रात आगमन होणे हे राज्याच्या औद्योगिक प्रगतीला चालना देणारे आहे. टेस्लाने मराठी भाषेचा आदर राखत स्थानिक नियमांचे पालन केले आहे. यामुळे राज्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. राज्य सरकार निवेशकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास कटिबद्ध आहे आणि टेस्लाचे हे शोरूम (showrooms) राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देईल. जगातील सर्वात स्मार्ट कार मुंबईतून आता भारतात येत आहे ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारने इव्ही गाड्यांसाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. चार्जिंग स्टेशन, गाडीवरचे कर आणि विविध सुविधा दिलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील इलेक्ट्रिक वाहन (electric vehicles) करिता सर्वात आवडते ठिकाण झाले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी उदघाटन कार्यक्रमात म्हटले. यावेळी टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे शोरूम ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांचा अनुभव देण्यासाठी ‘टेस्ला एक्सपिरियन्स सेंटर’ म्हणून कार्यरत असेल. येथे ग्राहकांना टेस्लाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल आणि वाहनांची चाचणीही घेता येईल.