Voter List Chaos – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच मतदार यादीतील घोळ आणि मतचोरी यावरून देशात आणि महाराष्ट्रात वातावरण प्रचंड तापले आहे. या निवडणुका घेण्यापूर्वी मतदारयादी सुधारावी या मागणीसाठी आज दोन स्वतंत्र सर्वपक्षीय शिष्टमंडळातील मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली.
उबाठा, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, कम्युनिस्ट या पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ दोन्ही निवडणूक अधिकार्यांना भेटले. या शिष्टमंडळास भाजपा आणि सत्ताधारी शिंदे व अजित पवार गटाने सहभागी व्हावे यासाठी त्यांनाही निमंत्रण पाठविण्यात आले होते. मात्र अपेक्षेनुसार ते उपस्थित राहिले नाहीत. आजच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकार्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
दुबार मतदार, एका घरात 70 सदस्य, 110 वर्षांचे वडील आणि 40 वर्षांचा मुलगा अशा भयंकर चुका मतदार यादीत असूनही यादी सुधारली का जात नाही? यंदाच्या निवडणुकीत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटची स्लीप का नाही? नवमतदारांची नोंदणी गेल्या जुलै महिन्यातच का थांबवली? या प्रश्नांना निवडणूक अधिकार्यांकडे उत्तरच नव्हते. अखेर दोन्ही निवडणूक अधिकार्यांनी उद्या एकत्रितपणे या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ दिला असून, उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा ही शिष्टमंडळे निवडणूक अधिकार्यांसोबत बैठक घेणार आहेत.
आज उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, कम्युनिस्ट नेते अजित नवले, आदित्य ठाकरे आदी नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली. दुसर्या शिष्टमंडळात अरविंद सावंत, बाळा नांदगावकर, वर्षा गायकवाड आदी नेते होते. या नेत्यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. या भेटींवेळी राज ठाकरे हे अतिशय आक्रमक झाले होते. राज ठाकरे यांनी सरळ सवाल केली की, 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
त्यानुसार निवडणूक घेण्याची तुमची तयारी झालेली आहे का? आपण मत टाकल्यावर ते कुणाला गेले हे व्हीव्हीपॅटवर दिसते. मात्र यावेळी व्हीव्हीपॅटच वापरणार नाही, असे तुम्ही कसे जाहीर केले. यावर चोक्कलिंगम म्हणाले की, जी नवीन मशीन आणली आहे त्यातच व्हीव्हीपॅटची सोयच नसल्याने यावर्षी व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाही.
निवडणूक वेळेत घेण्याची आमची तयारी पूर्ण आहे. यानंतर जयंत पाटील यांनी म्हटले की, मतदारांची नावे आहेत पण त्यांच्या घरांचे क्रमांक नाहीत, दुबार मतदार शोधण्यासाठी कोणतीही सोय नाही. असे अनेक घोळ यादीत दिसत आहेत. निवडणुका घेण्याआधी ही यादी सुधारणे गरजेचे आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, बोगस मतदार निदर्शनास आणून दिल्यानंतर कोणतीही कारवाई केली जात नाही.या सर्व प्रश्नांना निवडणूक अधिकार्यांनी अत्यंत भन्नाट अशी उत्तरे दिली. त्यांनी सांगितले की, दुबार मतदार असतील तरी त्यांची नावे डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला नाही.
आम्ही त्या मतदाराला बोलावतो आणि तो दोन्हीपैकी कुठल्या ठिकाणी मतदान करणार आहे ते विचारतो. ज्या ठिकाणी तो मतदान करणार नसेल त्या ठिकाणी मतदार यादीत त्याच्या नावापुढे कंसात ती माहिती नमूद करतो. मात्र त्याचे नाव डिलीट करणे आम्हाला शक्य नाही. निवडणूक अधिकार्यांनी असेही म्हटले की, तुम्ही आता ज्या चुका यादीत दाखवत आहात ती गेल्या विधानसभा निवडणुकीची यादी आहे. नवीन मतदार यादी आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत.
ती यादी जाहीर झाल्यानंतर तुम्ही ज्या चुका दाखवाल त्याची आम्ही दखल घेऊ. आता आम्ही काही करू शकत नाही. निवडणूक अधिकार्यांच्या या उत्तरांमुळे सर्वच नेते संतप्त झाले होते. या उत्तरावरून मतदार यादीत सुधारणा करण्यास निवडणूक अधिकार्यांना फारसा रस नसल्याचे स्पष्ट जाणवत होते, अशी माहिती जयंत पाटील आणि अरविंद सावंत यांनी पत्रकारांना दिली.
शिष्टमंडळातील सर्वच नेत्यांनी ठामपणे आपल्या प्रश्नांना ठोस उत्तरे मिळावी, अशी भूमिका घेतली. यावर अखेर केंद्रीय निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी उद्या दोन्ही शिष्टमंडळांच्या नेत्यांना एकत्र भेटण्याचे आश्वासन दिले. ही भेट उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. या भेटीनंतरच दोन्ही शिष्टमंडळांतील नेते पत्रकार परिषद घेणार आहेत.