कोल्हापूर – कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये नेण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून महादेवी परत येईपर्यंत कालभैरव यात्रा काढणार नाही असा ठाम निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
नांदणी गावातील श्री कालभैरवनाथ व श्री बिरोबा देवाच्या पालखी मिरवणुकीसह मोठ्या भक्तिभावात यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडते. यंदा ही यात्रा रविवार १० आणि सोमवार ११ ऑगस्ट रोजी आहे. या यात्रेत महादेवी हत्तीणीचा देखील सहभाग असतो. पण ती वनतारामध्ये असल्याने तिचा या वर्षी यात्रेत सहभाग राहणार नाही. आम्हाला आमची महादेवी परत द्या. आमची लेक परत आल्याशिवात यात्रा काढणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. गावकऱ्यांनी राज्य सरकारकडे महादेवीला पुन्हा गावात परत आणण्याची मागणी केली आहे.