करंजा मच्छीमार बंदरानजीक अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य

उरण – शासनाने तालुक्यातील करंजा गावाजवळ अत्यानुधिक मच्छीमार बंदराची उभारणी केली आहे. या बंदरानजीक असलेल्या मेरी टाईम बोर्डच्या जागेवर मोठ्या प्रमाणात कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य उभे राहिले असल्याचे चित्र आहे. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
उरण तालुक्यातील करंजा गावाजवळच कोट्यवधी रुपये खर्च करून मच्छीमार बांधवांसाठी बंदर उभारले आहे. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या इतर सोयीसुविधाकडे शासनाने लक्ष दिले नाही. त्यामध्ये डिझेल पंप, बर्फ़ाची फॅक्टरी, मच्छी साठवणूक केंद्र यांचा अभाव आहे. तसेच अरुंद रस्ता व छोटीमोठी दुकाने यासाठी जागा उपलब्ध नाही.
बंदरा जवळच मेरी टाईम बोर्डची जागा आहे. या जागेवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनेकांनी पक्के बांधकाम करून त्यामध्ये बेकायदेशीर व्यवसाय सुरू केले आहेत. याबाबत उरणमधील मेरी टाईम बोर्डाचे करंजा येथील निरीक्षकांची यांची भेट घेऊन तक्रार केली असता, त्यांनी आपण याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी व अधिकारी वर्गाकडे लेखी तक्रार करून कोणतीही कार्यवाही होत नसल्याची खंत व्यक्त केली. यावरून अशा अनधिकृत बांधकामाला आर्थिक साटेलोट्यातून मूक संमती असल्याची चर्चा मच्छीमार बांधवात सुरू आहे. अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Share:

More Posts