कोणत्याही बँकेतून पेन्शन मिळणार

नवी दिल्ली – कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतंर्गत पेन्शन मिळणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना १ जानेवारी २०२५ पासून कोणत्याही भागातील कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन काढता येईल. त्यामुळे पेन्शनसाठी ठराविक एका बँकेत ताटकळत राहावे लागणार नाही. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारला सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (सीपीपीएस) कडून हा प्रस्ताव देण्यात आला होता. या नवीन प्रणालीमुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा बदल होणार आहे. यामुळे ईपीएफओच्या ७८ लाख ईपीएस पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (सीपीपीएस)ला मान्यता हा ईपीएफओच्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.