गोमातेला मुंबईतून हद्दपार करणार

मुंबई- मुंबईत गुरांचे असंख्य गोठे आहेत, हे गोठे मुंबईबाहेर जावे यासाठी पालिकेने विचारपूर्वक योजना आखली आहे. गोठे मालकांचा त्यांच्या जमिनीवर हक्क असल्याने त्यांना हद्दपार करण्याऐवजी गाईंनाच कठीण परिस्थिती निर्माण केली जात आहे. ज्यामुळे गोठे मालक अखेर गुरांना मुंबईबाहेर नेतील. गोठ्यातील गाई भाड्याने घेऊन या गाई रोज दुपारी 1 पर्यंत मंदिराबाहेर बांधल्या जातात. मंदिरात येणारे भाविक गोमातेला चारा घालतात ज्याने गाईंचा उदरनिर्वाह होतो. ही योजना गेले अनेक वर्षे सुरळीत सुरू आहे.
मात्र आता गोठे हलवायचे म्हणून या गाई घेऊन बसण्यास प्रतिबंध केला आहे. या गाईंना नंतर मोकाट सोडतात आणि वाहतुकीत त्यांचा अडथळा येतो, असा कांगावा पोलीस व पालिका करीत आहे. त्यामुळे गाईवाले धास्तावले आहेत. त्यांची रोजीरोटी बंद झाली आहे. हे सर्वजण यातून मार्ग निघावा म्हणून राजकारण्यांना भेटत आहेत, पण कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. गोठेवाल्यांना गाई बाहेर नेण्यास मनाई केली आहे. त्यामुळे गाईंच्या पोषणाचा खर्च आता त्यांना करावा लागत असून, त्यांना तो परवडत नाही. गोठ्यांच्या प्रचंड मोठ्या जमिनींवर डोळा ठेवून मुंबईतून गोमातेला हद्दपार करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला आहे.