जगन्नाथ मंदिराच्या रत्नभांडारात ३ लोखंडी कपाटे, ४ लाकडी पेटारे

भुवनेश्वर – ओडिशातील पुरी येथील प्राचीन जगन्नाथ मंदिराचे रत्नभांडारातील आभूषणे बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. कालपासून या रत्नभांडारातून तीन मोठाली लोखंडी कपाटे आणि चार मोठ्या लाकडी पेटारे बाहेर काढण्यात आले. या कपाटांमध्ये आणि पेटार्यांमध्ये सोन्याचे दागिने आणि मौल्यवान रत्ने असा खजिना खच्चून भरलेला आहे.

लोखंडी कपाटांची उंची ६.५० फूट तर रुंदी ४ फूट आहे. तर लाकडी पेट्या ३ फूट उंच आणि ४ फूट रुंद आहेत. समितीच्या एका सदस्याने प्रथम एक पेटी उघडून पाहिली. त्यानंतर सर्व पेटारे आणि कपाटे रत्नभांडारातून बाहेर काढण्यात आली. कपाटे आणि पेटारे एवढ्या वजनदार होते की, त्या जागेवरून हलवणेही अवघड होत होते. कपाटे आणि पेट्या बाहेर काढण्यासाठी समितीच्या सदस्यांना तब्बल तास तासांचा अवधी लागला.
हा सर्व खजिना आता महाप्रभू जगन्नाथ यांच्या शयन कक्षामध्ये तात्पुरत्या कोषागारात ठेवण्यात आला आहे. जगन्नाथ मंदिराच्या आतील रत्नभांडारात ५०.६ किलो सोने तर १३४.५० किलो चांदीचे दागिने आहेत. या दागिन्यांचा आजवर कधीच उपयोग करण्यात आलेला नाही. मंदिराच्या बाह्य रत्न भांडारात ९५.३२० किलो सोने आणि १९.४८० किलो चांदीचे दागिने आहेत. हे दागिने सणासुदीच्या दिवशी बाहेर काढले जातात. तिसऱ्या म्हणजेच वर्तमान रत्न भांडारात ३.४८० किलो सोने आणि ३०.३५० किलो चांदीचे दागिने आहेत. अनुष्ठानाच्या दिवशी या दागिन्यांचा वापर केला जातो.