नवी दिल्ली – पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारताशी युद्ध छेडणाऱ्या पाकिस्तानने आज भारतासमोर लोटांगण घातले. आज दुपारी पाकिस्तानने भारताला फोन करून शस्त्रसंधी करण्याची विनंती केली. संध्याकाळी पाच वाजल्यापासून दोन्हीही देशांत युद्धबंदी झाल्याची घोषणा करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाकडून संध्याकाळी सव्वा सहा वाजता या युद्धबंदीची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्याच्या काही मिनिटे आधी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी पाकिस्तान आणि भारत तत्काळ युद्धविराम करण्यास सहमती दर्शवली असल्याचे सांगितले. मात्र अवघ्या तीन तासांत पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. रात्री काश्मीर, राजस्थान, पंजाबमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार आणि ड्रोन हल्ले करून युद्धबंदी मोडली.
आज संध्याकाळी 5 वाजता युद्धबंदी सुरु झाल्यानतंर पंजाब, राजस्थान आणि काश्मीरच्या सीमारेषेवरील भागांतील दुकाने खुली झाली. त्यासोबत स्थानिक लोकांची बाजारपेठेत वर्दळ सुरू झाली होती. मुले खेळण्यासाठी मैदानात उतरली. मात्र आज रात्री 8.30 वाजल्यापासून पाकिस्तानी लष्कराने युद्धबंदीचे उल्लंघन करुन श्रीनगरसह विमानतळ, लाल चौक, राजौरी, बारामुल्ला, सांबा, वैष्णोदेवी मंदिर परिसर, मेंढर, अखनुर, फिरोजपूर, उधमपूर, पोखरण, रामगढ, अबडासा, जखाऊ, बाडमेर, नलिया लष्करी विमानतळ, कच्छ, जैसलमेर भागांत शेकडो ड्रोनद्वारे हल्ला केला. मात्र सावध असलेल्या भारतीय जवानांनी सर्व ड्रोन हवेतच नष्ट केले.कारवाईवेळी या भागांसह जम्मू, पठाणकोट, अमृतसर आणि भूजमध्ये सायरन वाजून ब्लॅकआऊट केले. अखनुर, राजौरी, बारामुल्ला आणि सांबा सीमेवर पाकिस्तानी लष्कराने तोफगोळ्यांसह गोळीबार पुन्हा सुरुच राहिला. पाकिस्तानी लष्कराच्या दिशेने भारतीय जवानांनी गोळीबार करुन चोखउत्तर दिले. युद्धबंदीनंतरही पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. रात्री 8.55 वाजता जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पोस्ट केली की, युद्धबंदीचे काय झाले? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. त्यानंतर 10 वाजता भारतीय लष्कराने जाहीर केले की, सध्या सीमेरेषेवरील गोळीबार थांबला आहे. श्रीनगरमधील ड्रोन हल्ल्यासाठी आले होते. मात्र ते आम्ही उद्ध्वस्त केले. आता ड्रोन हल्ले थांबलेले आहेत.
या हल्ल्यानंतर रात्री 11 वाजता विदेशमंत्री विदेश सचिव विक्रम मिसरी यांनी पु्न्हा पत्रकार परिषद घेऊन सांगितले की,पाकिस्तानने युद्धबंदीचे घोर उल्लंघन केलेले आहे. पाकिस्तानने पुन्हा सीमेवर गोळीबार आणि ड्रोन हल्ला केला.याला पाकिस्तान जबाबदार आहे.त्यांच्या हल्ल्यांना भारतीय जवानांनी चोखउत्तर दिले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या हालचालीवर आपल्या जवानांनी बारीक नजर ठेवली असून हल्ला झाल्यास जवानांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्याआधी संध्याकाळी दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली होती. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, दोन्ही देश युद्धबंदीसाठी तयार आहेत. पाच वाजल्यापासून जमिनीवर, आकाशात आणि समुद्रातून होणारे हल्ले बंद झाले आहेत. दोन्ही देशांचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन (डीडीएमओ) 12 मे रोजी दुपारी 12 वाजता चर्चा करणार आहेत.तर पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार एक्स पोस्ट करत म्हणाले की, पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ युद्धविराम करण्यास सहमती दर्शवली आहे. पाकिस्तानने आपल्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता नेहमीच शांतता आणि सुरक्षेसाठी प्रयत्न
केले आहेत.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ही म्हणाले की, लष्करी कारवाई थांबवण्याबाबत दोन्ही देशात सहमती झाली. मात्र, दहशतवाद्याच्या मुद्द्यावर भारताने कुठलीही तडजोड केलेली नाही. भारताने आपल्या अटी-शर्तीवर युद्धबंदी केली आहे.
ही युद्धबंदी आपल्यामुळे झाल्याचे अमेरिकेने म्हटले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीच्या काही वेळेपूर्वी केलेल्या एक्स पोस्टमध्ये असे म्हटले की, आम्ही रात्रभर केलेल्या मध्यस्थींना यश आले. असे म्हटले जात आहे. तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही एक्स पोस्ट करत म्हटले आहे की, गेल्या 48 तासांपासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, परराष्ट्र मंत्री आणि लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने तत्काळ शस्त्रसंधी आणि सर्वसमावेशक चर्चेची सुरुवात करण्यावर सहमती दर्शवली. पंतप्रधान मोदी आणि शरीफ यांचे शांततेचा मार्ग स्वीकारल्याबद्दल कौतुक आहे.
मात्र, भारताने युद्धबंदीसाठी अशी कुठलीही मध्यस्थी झाल्याचा इन्कार केला. दोन देशांमध्ये थेट बोलणी
झाली, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक्स पोस्ट करुन सांगितले. भारताने हेही स्पष्ट केले की, दोन्ही देशांतील सिंधू करार रद्दच राहिल.भारताने पाकिस्तानवर लादलेले निर्बंधही कायम राहातील. दरम्यान, युद्धबंदी जाहीर होण्याच्या आधी पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोभाल, सीडीएस आणि भारतीय लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. 24 तासांत लष्कर प्रमुखांसोबतची ही त्यांची दुसरी बैठक होती. भविष्यात भारतावरील प्रत्येक दहशतवादी हल्ला, युद्धाचे कृत्य, युद्धाच-े कारण किंवा युद्धाची सुरुवात मानला जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
गेले चार दिवस भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखीच परिस्थिती उद्भवली होती. दोन्ही देशांत हल्ले-प्रतिहल्ले सुरू होते. त्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालल्याने चिंता वाढली होती. पाकिस्तानने काल रात्रीही भारतीय सीमेलगत ठिकाणांवर हल्ले केले होते.
आज झालेल्या लष्कराच्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री याची त्याची माहिती दिली. ते म्हणाले की, काल रात्री पाकिस्तानने पुन्हा एकदा चिथावणीखोर आणि तणाव वाढवणारी कारवाई केली. त्यात भारतीय शहरे, नागरी व काही लष्करी इमारतींना लक्ष्य करण्यात आले. भारतीय सैन्याने त्याला योग्य उत्तर दिले. काल आम्ही तुम्हाला एक फोटो दाखवला होता. पूंछमधील हल्ला झालेल्या गुरुद्वाराचा तो फोटो होता. हा हल्ला पाकिस्ताननेच केला होता. त्यात गुरुद्वारातील काही बांधवांना आपले प्राण गमवावे लागले होते. परंतु भारतीय सैन्यच आणि हवाई दल आपल्याच शहरांवर हल्ले करत आहे आणि पाकिस्तानला दोष देत आहेत, असा कांगावा पाकिस्तान करत आहे. जगाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. पाकिस्तानातील नानकाना साहिब गुरुद्वारावर भारत ड्रोन हल्ले करत असल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे. मात्र, हाही पाकिस्तानच्या अपप्रचाराचा एक भाग होता. पहलगाम हल्ल्यापासून पाकिस्तानने ही मोहीम सुरू केली आहे.
सुरुवातीपासूनच ते या सगळ्याला धार्मिक रंग देत आहेत.
पाकिस्तानने जम्मूतील शंभू मंदिरावरदेखील हल्ला केला. पाकिस्तानने डागलेले क्षेपणास्त्र मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पडले. भगवान शिव यांना समर्पित असलेल्या या मंदिरावर लोकांची खूप श्रद्धा आहे. शंभू मंदिर जम्मूतील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. क्षेपणास्त्र मंदिराजवळ पडल्याने नुकसान झाले नाही.
पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तान काश्मीरमधील शाळा आणि आरोग्य केंद्रांनाही लक्ष्य करत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळांसह पाकिस्तानने रुग्णालयांच्या इमारती व शाळांच्या परिसरांवरही हल्ले केले. ही एक अत्यंत निषेधार्ह कृती आहे. श्रीनगरपासून नालियापर्यंत 26 हून अधिक ठिकाणी हवाई घुसखोरीचा प्रयत्न पाकिस्तानने केला. उधमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भूजमध्ये किरकोळ नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या या कृतींनंतर भारताने ताबडतोब प्रत्युत्तर देण्यासाठी कारवाई केली. पाकिस्तानच्या रावळपिंडी (नूर खान एअरबेस ), चकवाल (मुरीद एअरबेस ), शोरकोट (रफिकी एअरबेस), सेंट्रल पंजाबमधील (रहीमयार खान एअरबेस), सियालकोटमधील (सरगोधा एअरबेस) आणि इस्लामाबादमधील चकलाला या पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला केला. आम्ही कमीत कमी नुकसान होईल या प्रकारे हे हल्ले केले. याउलट पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांचा गैरवापर केला. नागरी विमानांच्या आड भारतावर हल्ले केले, पाकिस्तानने आदमपूर, सुरतपूर, एस 400 प्रणाली, नगरोटा दारूगोळा केंद्र, ब्राह्मोस क्षेपणास्त्रे नष्ट केल्याचा दावा केला आहे. तो पूर्णपणे खोटा आहे. ब्रह्मोस आणि एस-400 संरक्षण प्रणाली देखील पूर्णपणे सुरक्षित आहे.
